Coronavirus India Cases : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. परंतु, मृतांच्या आकड्यात मात्र फारशी घट झाल्याचं पाहायला मिळत नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3460 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 76 हजार 309 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, एका दिवसापूर्वी शुक्रवारी 173,790 तर गुरुवारी 186,364 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
आज देशात सलग 17व्या दिवशी कोरोनाबाधितांच्या दैंनदिन रुग्णांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 46 दिवसांमधील सर्वात कमी कोरोनाबाधितांची आज नोंद करण्यात आली आहे. 29 मे रोजी देशभरात 21 कोटी 20 लाख 66 हजार 614 कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच एका दिवसापूर्वी 30 लाख 35 हजार 749 लसीचे डोसे दिले होते. तसेच आतापर्यंत 34 कोटी 31 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख कोरोना चाचण्यांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्क्यांहून अधिक आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 78 लाख 94 हजार 800
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 54 लाख 54 हजार 320
एकूण सक्रिय रुग्ण : 21 लाख 14 हजार 508
एकूण मृत्यू : 3 लाख 25 हजार 972
देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.16 टक्क्यांवर आहे. तर रिकव्हरी रेट 90 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 8 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
राज्यात शनिवारी सहा जिल्ह्यांमध्ये हजारच्या घरात नवीन कोरोना रुग्णांची नोंद, साताऱ्यात सर्वाधिक 2177 रुग्ण
राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज 20,295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 हजार 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 443 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत. राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या पुढे नोंद होत आहे. यात मुंबई 1038, अहमदनगर 1246, पुणे 1259, सातारा 2177, कोल्हापूर 1611 आणि सांगली 1063 असा समावेश आहे.
महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांतील कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन किंवा इतर निर्बंध पुढील पंधरादिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्ली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पुन्हा सुरु झाल्याने कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे ज्याने लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. परंतु जर आपण लोकसंख्येच्या आधारे विचार केला तर आपण बर्याच देशांच्या मागे असल्याचं आकडेवारी सांगते. टक्केवारीनुसार पाहिलं तर भारतात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. तथापि, आपल्या देशात लसीकरणाचा वेग जूनपासून वाढण्याची अपेक्षा आहे. भारताने लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ तीन टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 12 टक्के लोकांनी पहिला डोस दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus in India : देशात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत 50 टक्क्यांची घट, 3 आठवड्यांत कोरोनाला काहीसा ब्रेक
- आशियाई कांस्य पदक शहीद शेतकऱ्यांना समर्पित, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा; बॉक्सर स्वीटी बूराचे आवाहन