नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1,61,736 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनाने एकूण 879 लोकांचा बळी घेतला आहे. काल दिवसभरात देशात 97,168 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


देशभरात सध्या कोरोनाचे एकूण 1,36,89,453 रुग्ण आहेत. यामध्ये 12,64,698 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1,71,058 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच एकूण 1,22,53,697 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत. 


महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव; काल 52312 रुग्णांना डिस्चार्ज तर 51751 कोरोनाबाधितांची वाढ


राज्यात सोमवारी कोरोना रुग्णांचा आकडा कालच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळालं. महत्वाचं म्हणजे काल डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या वाढ झालेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त आहे. राज्यात आज 51751 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आणि काल नवीन 52312 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2834473 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 564746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. काल राज्यात 258 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं एकूण 58,245 लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.94% झाले आहे. पुण्यात आज दिवसभरात 9621 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 86 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 


देशाच्या राजधानीतही कोरोना बाधितांची संख्या वाढतीच, 24 तासांत 11 हजारांहून अधिक रुग्ण 


गेल्या 24 तासांत दिल्लीमध्ये कोरोनाची बाधा झालेले सर्वाधिक 11 हजार 491 रुग्ण आढळून आले. तर 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 5 डिसेंबरनंतर काल सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाच डिसेंबर रोजी 77 लोकांचा मृत्यू झाला होता. 19 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक 131 लोकांचा मृत्यू झाला होता. 


देशात लसीकरणाचा उत्सव


देशात लसीकरण अभियानाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी कोविड-19 लसीचे 37 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. ज्यामुळे देशात आतापर्यंत एकूण 10,82,92,423 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, टीका उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत लसीचे 37 लाखांहून अधिक डोस देण्यात आले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :