नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात पंतप्रधान मोदींकडे तीन मागण्या केल्या आहेत. यामध्ये योग्य पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या, कोरोनाशी संबंधित सर्व मेडिकल वस्तूंवर चा जीएसटी माफ करा तसेच पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण असं करण्याआधी सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. 


सोनिया गांधी आपल्या पत्रात म्हणाल्या की,  राज्यांना लस पुरवताना त्या त्या राज्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या आणि भविष्यातला संभाव्य ग्राफ लक्षात घेऊन पुरवठा राज्यांना करण्यात यावा.  कोरोनाशी संबंधित सर्व मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करा. सध्या वेंटीलेटर, ऑक्सीजन सिलेंडर यासह रेमडिसिविर आणि इतर औषधांवरही जीएसटी लागू होतो. पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण असं करण्याआधी सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करा.


लसीचा उत्सव साजरा करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी


कोरोनाच्या महामारीत पंतप्रधान मोदींनी देशाला एका नव्या उत्सवाचं आवाहन केलंय. हा उत्सव आहे टीका उत्सव...म्हणजे लसीकरणाचा उत्सव...आता ज्या राज्यांना मुळात लसच पुरेशा प्रमाणात मिळत नाहीय. त्यांनी हा उत्सव कशाच्या जोरावर करायचा हा मात्र प्रश्नच आहे.   कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झगडणाऱ्या राज्यांना पंतप्रधान मोदींनी एक नवा मंत्र दिला. टीका उत्सव... म्हणजे लसीकरणाचा उत्सव साजरा करा असं मोदी म्हणत आहेत..11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे तर 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती...याच निमित्तानं 11 एप्रिल ते 14 एप्रिल असा चार दिवसांचा हा लसीकरण उत्सव साजरा करा असं मोदींचं राज्यांना सांगणं आहे. 




पंतप्रधान मोदींची राज्यपालांसोबत बैठक 


देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यपालांसोबत बैठक करणार आहेत. केंद्रशासित प्रदेशांतील उपराज्यपालही या बैठकीत सहभागी होणार आहेत. 14 एप्रिलला  ही बैठक घेणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू देखील राज्यपालांसोबतच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.