वॉशिग्टन : येत्या पाच वर्षात, म्हणजे 2025 पर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान एक मोठं युद्ध होण्याची शक्यता असल्याचा अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने अमेरिकन सरकारला दिला आहे. अमेरिकच्या नॅशनल इन्टेलिजन्स कौन्सिलने ( National Intelligence Council) त्यांचा 'ग्लोबल ट्रेन्ड्स रिपोर्ट' ( Global Trends Report) अमेरिकन सरकारकडे दिला असून त्यामध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या अहवालाला जगातले सगळे देश आणि गुप्तचर संघटना गंभीरपणे घेतात. 


'फाईव्ह इयर रिजनल आऊटलूक रिपोर्ट- साऊथ एशिया' या प्रकरणात भारत-पाकिस्तानबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. भविष्यात दक्षिण आशियात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता येईल, या प्रदेशात अशांतता पसरेल असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याच प्रकरणात भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठं युध्द होण्याची शक्यता आहे असं सांगितलंय. हे युद्ध अनेक दिवस चालणार असून दोन्ही देशांच्या अनेक सैनिकांना यात बलिदान द्यावं लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 


पाकिस्तानच्या मीडियात या अहवालावरून खळबळ माजली असताना भारतात मात्र त्याची कोणतीही चर्चा होत नाही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र 'डॉन' ने 9 एप्रिलला या अहवालावर एक सविस्तर बातमी छापली असून त्यामध्ये यावर चिंता व्यक्त केली आहे. भारतात 'फ्रन्टलाईन' या मॅगेझिनने 10 एप्रिलला या अहवालावर एक लेख प्रसिद्ध केला आहे.


युध्दाचे कारण काय असेल? 
या अहवालात या दोन देशांदरम्यान केवळ युद्ध होणार असं सांगितलं नाही तर त्याचे कारणं काय असतील यावरही भाष्य करण्यात आलं आहे. त्यात येत्या पाच वर्षाच्या कालावधीत भारतात मोठा दहशतवाही हल्ला होणार असल्याचं सांगितलंय. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकार पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करेल आणि युद्ध सुरू होईल असं सांगितलंय. या आधी भारतात पुलवामा हल्ला झाला, त्यावेळी भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला उत्तर दिलं होतं. यामुळे भविष्यात भारतावर कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर देण्याचे संकेत त्या माध्यमातून देण्यात आले होते. 


भविष्यात भारतात दहशतवादी हल्ला होणार असून त्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानशी संबंधित असतील. त्यामुळे  या आधीच्या कारवाई प्रमाणे त्यावेळीही आक्रमकपणे कारवाई करावी असा दबाव भारतीय जनतेचा भारत सरकारवर असेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या मिस कॅलक्युलेशनमुळे या दोन देशात युध्द होईल असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.


अणूयुध्दाची शक्यता नाही
या अहवालात जरी भारत-पाकिस्तान दरम्यान मोठं युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी ते युध्द अणूयुध्दामध्ये रुपांतरित होण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलंय. दोन्ही देशांचे सरकार अणू हल्ल्याचे पाऊल उचलण्याची चूक करणार नाहीत असं नमूद करण्यात आलं आहे. पण या युध्दामुळे पुढची अनेक वर्षे या दोन देशांना आणि दक्षिण आशियाला गंभीर आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे असं सांगितलं आहे.


भारत-चीन दरम्यान गलवान घटनेची पुनरावृत्ती
या अहवालात भारत आणि चीन या दोन देशांच्या संबंधावरही भाष्य करण्यात आलं आहे. या दोन देशांच्या दरम्यान गलवानच्या खोऱ्यात जी झडप झाली तशीच एखादी घटना येत्या पाच वर्षात पुन्हा घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वगळता भारत आणि चीन दरम्यान कोणतंही युध्द होणार नाही असं या अहवालात सांगण्यात आलंय. 


दक्षिण आशियात अफगाणिस्तानचा नाजूक विषय
दक्षिण आशियाच्या प्रदेशात भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण करणारा आणखी एक विषय असेल तर तो आहे अफगाणिस्तानचा विषय. जर अमेरिकेने अफगाणिस्तानला तालिबानच्या हाती सोडून दिलं तर ती पाकिस्तानसाठी सुवर्ण संधी असेल. पाकिस्तानचे तालिबानशी संबंध लक्षात घेता या प्रदेशात अनेक दहशतवादी गटांना प्रशिक्षित करण्यात येईल आणि त्याचा वापर काश्मिर तसेच भारतातील इतर दहशतवादी कारवायांसाठी करण्यात येईल. त्यामुळे अफगाणिस्तानचे भविष्य काय असेल त्यावरच या प्रदेशाचे भविष्य ठरणार असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 


पाण्यावरून युध्द
युएनडीपी अर्थात युनायटेड नेशन्स डेव्हलपमेन्ट प्रोग्रॅमने त्यांच्या एका अहवालात सांगितलं आहे की, 2025 पर्यंत पाकिस्तानमध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवणार आहे. पाकिस्तानमध्ये पाण्याचे संवर्धन करण्याबद्दल कोणतीही पाऊले उचलली जात नाहीत. तसेच पावसाच्या पाण्याचेही नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे येत्या पाच वर्षात पाकिस्तानच्या एका मोठ्या लोकसंख्येला पाण्याच्या तुटवड्याला सामोरं जावं लागेल. अशा वेळी त्या देशातील नागरिकांच्यात सरकार विरोधात असंतोष वाढणार असून त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान भारतासोबत युद्ध छेडण्याचा प्रयत्न करेल असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.  


काय आहे ग्लोबल ट्रेन्ड्स रिपोर्ट? 
ग्लोबल ट्रेन्ड्स रिपोर्ट ( Global Trends Report) हा अमेरिकेच्या  नॅशनल इन्टेलिजन्स कौन्सिल (National Intelligence Council) कडून दर चार वर्षांनी तयार करण्यात येतो. हा अहवाल तयार करण्यासाठी अमेरिकेचे गुप्तचर खात्याकडून मोठा रिसर्च केला जातो. 


आतापर्यंतचे सर्व अहवाल खरे ठरले
अमेरिकन गुप्तचर खाते हा अहवाल कशा प्रकारे तयार करते किंवा त्यासाठीची माहिती कुठून घेतं याची कुणालाही कल्पना नाही. पण आतापर्यंतच्या सर्व जुन्या अहवालांचा अभ्यास केला असता ते सर्व  अहवाल खरे ठरले आहेत. भविष्यातील लोकसंख्येची दिशा आणि दशा, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान, जे जगावर परिणाम करू शकतात त्यांचा अभ्यास या अहवालात करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आणि व्यवस्था, वेगवेगळ्या देशांच्या व्यवस्था आणि समाजातील उभरत्या प्रेरक शक्तींचा अभ्यास आणि विश्लेषण या अहवालात करण्यात आलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 2040 सालापर्यंत जगभरात कोणत्या घडामोडी घडू शकतात त्यांचे विश्लेषण या अहवालात करण्यात आलं आहे. 


जागतिक आव्हाने, जगात कोणत्या गोष्टींवरून फूट पडू शकते, त्यावरून येणारी असमानता, स्पर्धा आणि त्याला जुळवून घेण्यासाठीचे प्रयत्न या पाच थीमच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 


हा अहवाल का विश्वासार्ह? 
ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना 2016-17 साली या आधीचा Global Trends Report तयार करण्यात आला होता. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की येत्या काही वर्षात जगात पॅन्डेमिक अर्थात महामारी येणार असून त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त होऊन ती मंदीत जाणार आहे. आता कोरोनाच्या अचानक आलेल्या महामारीमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून Global Trends Report मध्ये वर्तवण्यात आलेली शक्यता खरी ठरली आहे. 


या अहवालाचा इतिहास आणि त्याचा तंतोतंतपणा पाहिल्यास, भारत आणि पाकिस्तानच्या संभाव्य युध्दाची शक्यता लक्षात घेता दक्षिण आशिया खरोखरच अशांततेच्या उंबरठ्यावर आहे.  


महत्वाच्या बातम्या :