नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरसह देशातील अनेक भागांत सूर्याचा तडाखा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रातही उन्हाळी वारे वाहू लागल्यामुळं तापमानाचा पाराही चांगलाच वर गेला आहे. रस्त्यावर चालतानासुद्धा घामाच्या दारा ओघळू लागल्या आहेत. एप्रिल महिन्यातच ही अवस्था, तर मे आणि जून मध्यापर्यंत काय अवस्था होणार, अशा विचारात असणाऱ्यांना अनेकांनाच आता हवामान खात्यानं दिलासा दिला आहे. 


हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवसांमध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. ज्यामुळं वातावरणात गारवा येणार आहे. दक्षिण द्विपावर चक्रिवादळसदृश वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. ज्यामुळं देशाच्या दक्षिण- पश्चिम भागात पुढील पाच दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता नाकारता येत नाही. वादळी वाऱ्यांसप वीजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाटासह वरुणराजाही बरसू शकतो. 


हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 14-16 एप्रिलदरम्यान, तामिळनाडूच्या दक्षिण भागात आणि किनारपट्टी भागात, केरळ आणि कर्नाटकच्याही किनारी भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय दक्षिण- पश्चिम मध्य प्रदेश आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातही वादळी वाऱ्यांचे झोत जाणवू शकतात. ज्यामुळं मध्य प्रदेश, महाराष्ट्रात विदर्भ पट्टा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओडिशा या राज्यांमध्ये पुढील 4-5 दिवसांत पर्जन्यमानाचा अंदाज आहे. 


Maharashtra Rain | पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस, शेतकरी हवालदिल, कोकणात आंब्याचं मोठं नुकसान


देशातील हिमालय क्षेत्रात येणाऱ्या राज्यांमध्येही 14-17 एप्रिल या काळात पावसाचा अंदाज आहे, तर मैदानी भागात 15-17 एप्रिलला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बल्तिस्तान, मुजफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेश या भागांत 14-17 एप्रिल या काळात गारपीटीची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली असून, इथं धुळीचे लोटही उठू शकतात असं सांगितलं जात आहे. 


महाराष्ट्रात अवकाळीचं संकट 


हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये रविवारी रात्री आणि सोमवारी जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारपासूनच सिंधुदुर्गसह राज्यातील तुरळक भागांत पावसानं हजेरी लावली होती. ज्यानंतर मराठवाडा, विदर्भाकडेही पावसानं आपला मोर्चा वळवल्याचं दिसून आलं. आज पुणे, सोलापूरच्या काही भागात जोरदार पावसाने वादळासह हजेरी लावली. या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतमाल, फळांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं.