शिमला : कोरोना काळात अनेक ठिकाण निर्बंध लागू करण्यात आले. साधारण वर्षभराच्या निर्बंधांनंतर काही अंशी नियमांमध्ये शिथिलताही आली. भटकंतीचं वेड असणाऱ्या आणि कित्येक दिवस घरातच कोंडलेल्या अनेकांनीच मग वाट धरली ती म्हणजे देशातील पर्यटनस्थळांची. मोठ्या प्रमाणात युवा वर्गानं गिरीस्थानांची निवड करत त्या दिशेनं कूच केली. पण, आता मात्र कोरोनाची दुसरी लाट देशावर धडकलेली असतानाच पर्यटन स्थळांसाठी ओळखल्या राज्यांमध्येही काही पावलं उचलण्यात येत आहे. 


पर्यटकांची पसंती असणाऱ्या हिमाचल प्रदेश या राज्यात कोरोना काळातही पर्यटकांवर कठोर निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. पण, परिस्थितीचं गांभीर्य जाणत राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकू यांनी रविवारी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. राज्यात (हिमाचल प्रदेशमध्ये) येणाऱ्या पर्यटकांकडे कोविड चाचणीचा निगेटीव्ह अहवाल असणं त्यांनी बंधनकारक असल्याचं सांगितलं. 


In Pics | लेकासोबत हार्दिक पांड्याचा Relax Mode On


पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून हिमाचलच्या दिशेनं येणाऱ्या पर्यटकांकडे 72 तासांदरम्यानचा कोविडच्या (RT PCR) आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असणं अपेक्षित असेल. तरच, पर्यटकांना हिमाचलमध्ये प्रवेश करता येणार आहे. 


Haridwar Maha Kumbh 2021: शाही स्नानादरम्यान कुंभ मेळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 


16 एप्रिलनंतर ही नियमावली लागू करण्यात येणार आहे. शिवाय मुख्यमंत्री सातत्यानं राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावाही घेत आहेत. त्यामुळं येत्या दिवसांमध्ये हिमाचलच्या दिशेनं जाण्याचा बेत तुम्ही आखत असल्यास ही बाब जरुर लक्षात घ्या. 


पर्यटकांवर बंदी नाहीच... 


राज्यात पर्यटकांच्या येण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नसल्याची बाब खुद्द हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केल्यानंतर कोरोना चाचणी अहवालाची अट समोर आली. कोरोना देशभरात अतिशय वेगानं फैलावत असल्यामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊनची नामुष्की ओढावली आहे. पण, हिमाचल प्रदेशात मात्र इतर ठिकाणहून येणाऱ्या पर्यटकांवर कोणत्याही पद्धतीचे निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. 


'पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय राज्याच्या वार्षिक सरासरी उत्पन्नामध्ये 7 टक्क्यांचं योगदान देतात. सहसा इथं पर्यटनस्नेही मोसमात 2 कोटींच्या जवळपास नागरिक भेट देतात. कोविड लॉकडाऊनमुळं येथील व्यवसायांना मोठं नुकसान झालं होतं. आता कुठं पुन्हा एकदा येथील व्यवसायाला चालना मिळली होती. पण, कोरोनाची दुसरी लाट धडकली. असं असलं तरीही तूर्तास पर्यटक आणि पर्यटनावर कोणतीही बंदी नसून आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत', असं हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले.