(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronaviris : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची कोरोनाबाधितांना दोन कोटी रुपयांची मदत, फंड उभारण्यास केली सुरुवात
देशातील कोरोनाबाधितांना मदत करणाऱ्यांच्या यादीत आता विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचेही नाव समोर आलं आहे. त्यांनी कोरोनाबाधितांना दोन कोटी रुपयांची मदत केली आहे.
मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर रूप धारण केलं असून रोजच्या रुग्णवाढीच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना मदत करण्यासाठी आता अनेक लोकं पुढे येत असून त्या यादीत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचेही नाव सामिल झाले आहे. या जोडप्याने कोरोनाबाधितांना मदत म्हणून दोन कोटी रुपये दिले आहेत.
या दोघांनी कोरोनाबाधितांना मदत म्हणून एक फंड उभारायला सुरुवात केली असून Ketto या नावाच्या प्लॅटफॉर्मवर #InThisTogether या नावाने एक फंड उभारायला सुरु केलं आहे. या फंडच्या माध्यमातून विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सात कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष ठेवलं आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने यावर एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये सांगितलं आहे की, #InThisTogether या नावाने हे अभियान सात दिवस चालेल. या अभियानाच्या माध्यमातून जे काही पैसे जमा होतील ते ACT ग्रांट्स नावाच्या एका संस्थेला देण्यात येतील. या फंडच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा तसेच इतर अनेक प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
आपला देश आता एका मोठ्या संकटातून वाटचाल करत असून या वेळी आपण एकत्र आलं पाहिजे आणि लोकांचे जीव वाचवले पाहिजेत. त्यामुळे या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असं आवाहन विराट कोहलीने केलं आहे. तर या फंडच्या माध्यमातून कोरोनाबाधितांना लढण्यास मदत मिळेल अशी आशा अनुष्का शर्माने केली आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 4,14,188 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3,915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 लाख 31 हजार 507 रुग्ण उपचारावर मात करुन घरी परतले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- COVID-19 India Death : भारतात गेल्या 10 दिवसांत सर्वाधिक कोरोना बळींची नोंद, देशात प्रतितास 150 रुग्णांचा मृत्यू
- Covid-19 : कोरोनामुक्त झाल्यानंतर उद्भवतो 'या' गंभीर समस्यांचा धोका, ऑक्सफर्डच्या रिसर्चमधून खुलासा
- Coronavirus : कोरोनाच्या लढाईमध्ये भारताला जगभरातून साथ, जाणून घ्या कोणता देश काय मदत करतोय?