पणजी : मागील काही दिवसांत गोव्यात अचानक रुग्णांची वाढ झाली आणि त्यामुळे प्रशासनावर ताण आला. यामुळे ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली आणि मंगळवारी 26 रुग्णांचा तर बुधवारी 21 रुग्णांचा मृत्यू झाला, गुरुवारी 13 आणि आता शुक्रवारी पुन्हा आठ रुग्ण दगावल्याची घटना समोर आली आहे. या घटनांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. 


सध्या ऑक्सिजन पुरवठा ही गोव्याची सर्वात मोठी चिंता बनली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. याबाबत बोलताना उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने म्हंटल आहे की, आमच्यासमोर जी कागदपत्रे ठेवण्यात आलीत त्यावरून स्पष्ट होतंय की, रुग्ण अक्षरशः तडफडतायत. केवळ ऑक्सिजनच्या अभावामुळे त्यांना प्राण गमवावे लागत आहेत. 


ऑक्सिजनसाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यांवर अवलंबून असलेल्या गोव्यात सध्या 26 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन पुरवठा मंजुर करण्यात आला आहे. त्यातला जवळपास 40 टक्के साठा हा कोल्हापूरातून जात आहे. आता हा साठा दुप्पट करण्याची मागणी गोवा सरकारने केंद्राकडे केलीय. 


विरोधी पक्षांचा आरोप आहे की गोव्यात ॲाक्सिजन आण्यासाठी ट्रॅक्टर चालक नाहीत, कोल्हापुरवरुन चालक आणावे लागत आहेत. ॲाक्सिजन पुरवठा वेळेवर होत नाही. यामुळे रोज रात्री रुग्णांचा मृत्यु होत आहे. दुसरीकडे या कोलमडलेल्या स्थितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या परस्परविरोधी दाव्यांचा वाद गोव्याला पाहावा लागतो आहे. 


गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा दावा आहे की, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये वाद सुरू आहेत त्यामुळे गोव्याला आशा परिस्थितीला सामोरे जावं लागतं आहे. हा मृत्यू नाही तर शासनाने केलेली हत्या आहे असं सांगत मुख्यमंत्री प्रोमद सावंत यांच्याविरुद्ध खुनाची केस दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 


ॲाक्सिजन पुरावठ्या अभावी रुग्णांचे मृत्यू होत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. एकाच सरकार मध्ये असून केवळ राजकीय वर्चस्वासाठी दोघांमध्ये प्रचंड आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना रुग्णांच्या मृत्युचं कारण विचारलं असता सावंतनी ऑक्सिजनची उपलब्धता आहे परंतु वितरण व्यवस्थित नाही असं म्हंटल तर आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं विधान खोटं आहे असं सांगितलं. त्यामुळे या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केलीय. 


गोव्यात आजच्या घडीला कोविडंमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1804 इतकी झालीय. त्यातले 150 मृत्यू केवळ मागच्या दोन दिवसांतले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वतः गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ठाण मांडून बसलेत. शिवाय जाणीवपूर्वक आरोग्यमंत्र्यांचे कार्यकर्ते अफवा पसरवत असल्याचं देखील त्यांनी म्हंटलय. मात्र लसीकरणाबाबत गोव्यासारखं राज्य आद्यप बरंच मागे आहे. त्यामुळे आगामी काळ गोव्यासाठी आणखी कठीण असेल यात शंका नाही.


महत्वाच्या बातम्या :