(Source: ECI/ABP News/ABP Majha)
corona vaccination: पहिल्याच दिवशी तब्बल 25 लाख जणांची लसीकरणासाठी नोंदणी
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस (corona vaccination) देण्यात येणार आहे. त्यासाठी आता कोविनच्या http://cowin.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी सुरु आहे.
नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या टप्प्याला सोमवार एक मार्चपासून सुरुवात झाली असून या एकाच दिवशी तब्बल 25 लाख लोकांनी लसीकरणासाठी नोंद केल्याचं पहायला मिळतंय.
कोरोना लसीकरणासाठी कोरोनाच्या संकेतस्थळावर (http://cowin.gov.in) नोंद करणं गरजेचं आहे. तसेच आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते. सरकारच्या या अॅपवर आणि संकेतस्थळावर नोंदणी करताना लोकांनी गर्दी केल्याने काही काळ या अॅप आणि संकेतस्थळाच्या कामामध्ये अडथळा आल्याचंही पहायला मिळालं.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची लस घेतली. त्यांच्या नंतर देशातल्या अनेक राजकीय नेत्यांनी ही लस घेतल्याचं दिसून आलंय. ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या दुसऱ्या टप्प्यात लस मिळणार आहे. ज्या लोकांना हृदय, कॅन्सर, किडनी संबंधी आजार, डायबेटिस, हायपरटेन्शन असे गंभीर असे आजार आहेत आणि त्यांचे वय हे 45 वर्षावर आहे, त्यांनाही या टप्प्यात लस मिळणार आहे.
लसीकरणासाठी एखादी व्यक्ती कोणत्याही राज्यात आपले नांव नोंद करु शकते. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.
सोमवारी पहिल्या दिवशी 60 वर्षावरील 1.3 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे तर 45 ते 60 वर्षामधील 18,850 इतक्या लोकांनी कोरोनाची लस टोचून घेतली असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलंय. या कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जवळपास 1.5 कोटी कोरोनाच्या लसी तयार ठेवण्यात आल्या आहेत.
Sharad Pawar | शरद पवार यांनीही कोरोना लस घेतली, मोदींनी न पाळलेला नियम पवारांनी मात्र पाळला!