गुजरात : हाँगकाँग, बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये एकदा कोरोनाची लागण झाल्यानंतर काही रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आता भारतातही असं उदाहरण समोर आलं आहे. काही रुग्णांना एकदा संसर्ग होऊन बरं झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण झाल्यांचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातही चिंता वाढली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील 54 वर्षीय महिला कोरोनाग्रस्त होऊन बरी झाल्यानंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. 23 ऑगस्ट रोजी RT-PCR तपासणीत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. याआधी एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ही महिला कोरोनामुक्त झाली होती.


BLOG | कोरोनाची लागण 'पुन्हा' होऊ शकते?


एकदा लागण झाल्यानंतरही पुन्हा होतोय कोरोना


मंगळवारी इसानपूर रुग्णालयातील डॉक्टरांनी दावा केला की, 'एप्रिलमध्ये कोरोनाग्रस्त असल्यामुळे उपचारानंतर संबंधित महिला कोरोनामुक्त झाली होती. परंतु, आता या महिलेला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.' डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, कदाचित एकदा लागण झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं उदाहरण असू शकतं. रतन रुग्णालयात महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रज्ञनेश वोरा यांनी सांगितलं की, 'या प्रकरणात महिलेला कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाल्याचं दिसत आहे. चार महिन्यांपर्यंत या महिलेला कोणत्याही समस्या उद्भवल्या
नव्हत्या. परंतु, चार महिन्यांनी महिलेत पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणं दिसून आली. याआधी महिलेचा रिपोर्ट दोन वेळा नेगेटिव्ह आला होता.'


असं सांगण्यात येत आहे की, 18 एप्रिल रोजी महिलेला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर तिला अहमदाबादच्या सिविल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात ती महिला नेगेटिव्ह आढळून आली. 20 ऑगस्ट रोजी महिला रेपिड अँन्टीजन टेस्टमध्ये पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. पहिल्यांदा नेगेटिव्ह आल्यानंतरही चार महिन्यांनी म्हणजेच, 23 ऑगस्ट रोजी RT-PCR मध्ये महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं.


उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा होतोय कोरोना!


चार महिन्यांनंतर महिला कोरोना पॉझिटिव्ह


रतन रुग्णालयातील डॉक्टर प्रज्ञनेश वोरा यांनी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) ला या प्रकरणाची माहिती दिली आहे. पुन्हा संसर्ग झाला असल्याचं स्पष्ट करत डॉक्टर धवल पनखनिया म्हणाले की, 'आमच्याकडे आढळून आलेला पुन्हा कोरोनाचा संसंर्ग झालेलं हे पहिलं प्रकरण आहे. महिलेमध्ये कोरोना व्हायरस झाल्यानंतरही आजाराची लक्षणं आढळून आलेली नाहीत. महिलेची प्रकृती स्थिर आहे.' दरम्यान, डॉक्टरांनी हेदेखील सांगितलं की, ICMR ने संशोधन आणखी दृढ करण्यासाठी तज्ञांकडून अतिरिक्त तपासणीचे आदेश दिले आहेत. यासाठी
महिला रुग्णाचा रक्ताचा नमुना आणि स्वॅब सॅम्पल नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे येथे पाठवण्यात येणार आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :