नवी दिल्ली : राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे, असं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. एका पक्षाची सूत्रं पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याच्या हातात राहणं लोकशाहीच्या विरोधात आहे. ज्यांनी लोकशाही मूल्य गमावलं आहे ते लोकशाहीचं संरक्षण कसं करु शकतील? असा सवाल करत मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणाही साधला. संविधान दिनाच्या निमित्ताने संसदेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत एका अशा संकटाकडे जात आहे जो संविधानाशी समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या चांगल्या गुणांच्या आधारे एका परिवारातून अनेक लोकं राजकारणात येत असतील तर ती घराणेशाही नसते, असंही ते म्हणाले.

  


Constitution Day : आज संविधान दिन... का साजरा केला जातो हा दिवस? इतिहास आणि रंजक गोष्टी


संविधान दिवस समारंभात पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, आजचा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या पवित्र जागेवर काही लोकांनी भारताच्या कुशल भविष्यासाठी मंथन केलं होतं.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजच्या दिवशी 2008 साली मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानं देश हादरुन गेला होता. आपल्या सैन्यानं दहशतवाद्यांशी निकराचा लढा दिला होता. यात जवानांसह काही नागरिकांनी बलिदान दिलं होतं. या सर्व वीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे.  


... म्हणून साजरा केला जातो संविधान दिवस


Constitution Day:   26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. भारत सरकारने 2015 मध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो.