Devendra Fadnavis : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीत झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आज नेमकं शिजतेय काय? अशी चर्चा रंगली आहे. नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे मनसे-भाजप युतीवर दिल्लीत खलबतं सुरु आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.
चंद्रकांत पाटील दिल्लीत –
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शाह यांना दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी या भेटीनंतर सांगितलं. तर, राज्यातील सद्यस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिल्याचे समजतेय.
देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत –
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस राजधानीत पोहचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलेय. राज्यातील महत्वाच्या दोन नेत्याच्या दिल्लीवारीनंतर राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. फडणवीस-पाटील यांच्या दिल्लीवारीनंतर मनसे-भाजप यांच्या युतीबाबत चर्चा रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला –
बुधवारी दुपारी अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले. ही एक कौटुंबिक भेट असल्याचं बोललं जात होतं. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट बोलता येणार नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली असावी.
मनसे-भाजप युतीवर चर्चा?
फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, काही मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे युतीची चर्चा फिसकटल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच या दोन्ही नेत्यांनी दिल्लीवारी केल्यामुळे दोन पक्षातील युतीवर आणखी चर्चा सुरु झाली आहे.
मनसे-भाजप युती का?
2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली. शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या मित्रपक्षासोबत युती करण्यास उत्सुक आहे. भाजपा आणि मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. या युतीचा पहिला प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसेने गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाची वाट धरल्याचेही पाहायला मिळालं. भाजपही हिंदुत्वाच्या विचारसरणीला मानणारा पक्ष आहे. त्यामुळे हिंदुत्व दोन्ही पक्षांना जोडणार समान धागा आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं, त्यामुळे भविष्यात या दोन पक्षांमध्ये युतीची शक्यता नाकारता येत नाही.