Karnataka Election Priyanka Gandhi: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगलेच यश मिळाले. हिमाचल प्रदेशमधील निवडणूक विजयानंतर काँग्रेसला कर्नाटकमध्ये यश मिळाले. काँग्रेसने या यशासाठी मतदारांचे आभार मानले आहेतच शिवाय पक्षाच्या सामूहिक नेतृत्वालाही त्याचे श्रेय दिले आहे. या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप केले. मात्र, मागील काही वर्षात जे काँग्रेसच्या अनेक नेत्यांना जमले नाही. ते, प्रियांका गांधी यांना जमले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. प्रियांका गांधी यांनी टाकलेल्या एका डावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रह्मास्त्र निष्प्रभ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसकडून प्रचारात तीच चूक
निवडणूक प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका भाषणात भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना विषारी सापाची उपमा दिली होती. त्यानंतर भाजपने हा मुद्दा व्यवस्थितपणे उचलला. खर्गे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने पुन्हा पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्य करून जुनीच चूक पुन्हा केली आहे का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
2014 सालापासून पंतप्रधान मोदींवर सर्वच नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे काँग्रेसलाही पराभवाला सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले जात आहे. कर्नाटकात खर्गे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रियांका गांधी यांनी धुरा हाती घेत एक डाव खेळला. त्यामुळे भाजपला या मुद्याचा फार उपयोग करता आला नाही.
खर्गेंविरोधात भाजप आक्रमक
मागील महिन्यात निवडणूक प्रचार सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे असल्याचे म्हटले. त्यामुळे तु्म्ही त्यांच्याजवळ गेलात की ते विषारी डंख मारणार आणि तुम्हाला मृत्यू येणार, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. या मुद्यावर भाजप चांगलीच आक्रमक झाली होती. त्यानंतर खर्गे यांनी स्पष्टीकरणही दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत काँग्रेसने आपल्याला आतापर्यंत 91 वेळेस शिवीगाळ केली असल्याचा दावा केला. त्याशिवाय, भाजपने या अपशब्दांची यादीच जाहीर केली होती. त्यामुळे प्रचारात मोदी यांना सहानुभूती मिळणार असल्याची चर्चा झाली.
प्रियांका गांधींचा डाव
निवडणूक प्रचारादरम्यान बागलकोट येथील एका सभेत बोलताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत देशाने गरिबांची अश्रू पुसण्याचे काम केले. पण, देशाला रडणारे पंतप्रधान मिळाले आहेत. या लोकांनी माझ्या कुटुंबाला कितीतरी वेळा शिव्या दिल्या आहेत. आमच्या कुटुंबाने त्या शिव्या मोजायला सुरुवात केली तर अनेक पुस्तके प्रकाशित करावी लागतील, असे म्हटले.
प्रियांका गांधी यांनी म्हटले की, मी अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. इंदिरा गांधींनी देशासाठी गोळ्या झेलल्या, राजीव गांधींनी बलिदान दिले. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी परिश्रम घेतले. पण ते (पंतप्रधान मोदी) पहिले पंतप्रधान आहेत जे तुमच्यासमोर येतात आणि आपल्यावर अत्याचार होत असल्याचे ओरडतात. तुमचे दु:ख ऐकण्याऐवजी तो इथे येतात आणि स्वतःबद्दल सांगतात आणि रडतात. पण, तुमचे अश्रू पुसत नाही.
प्रियांका गांधी यांच्या भाषणातील हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकांनी हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला. तर, सोशल मीडियावर Cry PM चा ट्रेंड दिसून आला. प्रियांका गांधींच्या या भाषणानंतर भाजप काहीसं बॅकफूटवर गेले. त्यामुळे खर्गे यांच्या वक्तव्याचे सहानुभूतीत भाजपला रुपांतर करता आले नाही.