Karnataka Election Top Leaders Strike Rate: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले असून भाजपला जोरदार धक्का बसला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या अनेक दिग्गज नेते उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एक हाती सांभाळली होती. त्याशिवाय, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांसह इतर नेत्यांनी प्रचार केला होता. तर, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, डी.के. शिवकुमार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.
भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनात रोड शो, जाहीर सभा घेतल्या. या नेत्यांनी प्रचार केलेले किती उमेदवार विजयी झाले, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. नेमका त्यांच्या विजयाचा स्ट्राईक रेट किती राहिला, यावर एक नजर...
भाजप नेत्यांचा स्ट्राईक रेट किती?
भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 44 मतदारसंघासाठी प्रचार केला. यामध्ये 17 जागांवर भाजपने, तर 24 जागांवर काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकावला आहे. तर जेडीएसला 3 जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदींचा स्ट्राइक रेट 39 टक्के इतका आहे.
त्याच वेळी गृहमंत्री अमित यांनी 36 मतदारसंघासाठी प्रचार केला. यामध्ये भाजपने 10 तर काँग्रेसने 23 जागा जिंकल्या आहेत. तर जेडीएसला 3 जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार त्याचा स्ट्राइक रेट 28 टक्के राहिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 11 विधानसभा जागांवर प्रचार केला. त्यापैकी भाजपने 3 तर कॉंग्रेसने 7 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी एका जागेवर कल्याण राज्य प्रगती पक्षाचा उमेदवार विजयी झाला. योगी आदित्यनाथ यांच्या यशाचा स्ट्राइक रेट 27 टक्के इतका आहे.
काँग्रेस नेत्यांना किती यश?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 26 मतदारसंघासाठी प्रचार केला होता. त्यातील 17 जागांवर काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. तर, 8 जागांवर भाजप आणि एका जागेवर जनता दल सेक्युलरचा उमेदवार विजयी झाला. त्यानुसार राहुल गांधी यांच्या प्रचार यशाचा स्ट्राईक रेट हा 65 टक्के इतका राहिला.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी 26 मतदारसंघाच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यापैकी 16 जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले. तर, 9 जागांवर भाजप आणि जेडीएसने एका जागेवर विजय मिळवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 28 मतदारसंघाचा प्रचार केला. त्यापैकी 16 जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले. तर भाजप 9 जागांवर आणि जेडीएस 3 तीन जागांवर विजयी झाले. त्यानुसार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विजयाचा स्ट्राईक रेट 57 टक्के इतका आहे.