BC Nagesh: हिजाबवरून वाद पेटवून दिलेल्या कर्नाटकचे शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीसी नागेश यांचा जनतेनं मतदानातून करेक्ट कार्यक्रम करत घरी बसवलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections 2023) काँग्रेसच्या के शदाक्षरी यांनी तिप्तूर मतदारसंघातून तब्बल 17,652 मतांच्या फरकाने पराभव केला. बीसी नागेश शैक्षणिक संस्थांच्या वादात हिजाब बंदीच्या केंद्रस्थानी होते. शालेय पाठ्यपुस्तकांतील वादग्रस्त बदलाचे समर्थन केल्यामुळेही त्यांना मोठा फटका बसला आहे. तिप्तूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नागेश 2008 आणि 2018 मध्ये विजयी झाले होते. यावेळी काँग्रेसच्या शदाक्षरी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवत आमदार झाले आहेत. बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नागेश यांना 2021 मध्ये मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. तिप्तूर जागेवर 1,54,676 मतदारांनी मतदान केले होते. 


हिजाब वादाच्या केंद्रस्थानी 


मुस्लीम मुलींना सरकारी महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास मनाई करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने विभाजित निर्णय दिल्यानंतर, नागेश यांनी आदेश वैध राहील यावर जोर देत राहिले होते. सरकारी संस्थांमधील हिजाब विरुद्धच्या वादात ते केंद्रस्थानी होते. बायबल आणि कुराण सारख्या धार्मिक ग्रंथांची भगवद्गीतेशी तुलना होऊ शकत नाही, असे म्हणत नागेश यांनी वाद निर्माण केला होता.


2021 मध्ये, नागेश यांना बसवराज बोम्मई यांच्या मंत्रालयात समाविष्ट करण्यात आले आणि त्यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री करण्यात आले होते. दक्षिणेकडील राज्यात काँग्रेस आरामात विजयासाठी सज्ज आहे, ज्यामुळे भारताच्या दक्षिणेकडील भागातून भाजप हद्दपार होणार आहे. विधानसभेच्या 224 पैकी 136 जागांवर काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली असून भाजपला केवळ 64 जागांवर विजय मिळवता आला आहे. 


राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा कर्नाटकात प्रभाव


दुसरीकडे, राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील कन्याकुमारीतून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप काश्मीरमध्ये झाला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकात 21 दिवसांत 511 किलोमीटरचा प्रवास केला होता. 30 सप्टेंबर 2022 ते 19 ऑक्‍टोबर 2022 या काळात कर्नाटकातील सात जिल्ह्यांमधून भारत जोडो यात्रा गेली होती. ज्यात विधानसभेच्या 51 जागा आहेत. या 51 पैकी 34 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाकडे भारत जोडो यात्रेचा सकारात्मक परिणाम म्हणून पाहिले जात आहे. यात्रेशी संबंधित व्हिडिओ शेअर करून काँग्रेसने यावर शिक्कामोर्तब केले आहे. मूळचे कर्नाटकचे असलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हा विजय 'जनता जनार्दन'चा 'विजय' असल्याचे म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या