नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं (Congress President Election) चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. गांधी कुटुंबाचा पाठिंबा असलेले मल्लिकार्जुन खर्गे विरुद्ध शशी थरुर यांच्यात मुख्य लढाई होणार आहे. खर्गे यांचा उमेदवारी अर्ज भरताना जी 23 गटातले भूपिंदर सिंह हुड्डा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे खर्गे हेच पक्षातले सर्व सहमतीचे उमेदवार मानले जात आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. काल संध्याकाळपर्यंत दिग्विजय सिंह यांच्या नावाची चर्चा होती. पण रात्री नाट्यमय घडामोडीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव समोर आलं. दिग्विजय सिंह हे राजघराण्यातले आहेत तर खर्गे हे दलित नेते आहेत. शिवाय दक्षिण भारतातल्या ज्या एकमेव राज्यात भाजपची स्थिती मजबूत आहे त्या कर्नाटकमधून खर्गे येतात. कर्नाटकमध्ये लवकरच निवडणुकाही होणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. खर्गे, थरुर यांच्याशिवाय झारखंडचे माजी मंत्री के एन त्रिपाठी यांनीही अर्ज भरलेला आहे. आता 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
अध्यक्षपदाच्या उमेदवारांचा इतिहास काय आहे?
शशी थरुर - केरळच्या तिरुअनंतपुरममधून तिसऱ्यांदा लोकसभा खासदार आहेत. थरुर यूपीए सरकारच्या शेवटच्या काळात मनुष्यबळ विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री होते. सध्या 66 वर्षांचे असलेले थरुर यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण विदेशात पूर्ण केलं आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये अनेक दशकं त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं. कोफी अन्नान महासचिव संयुक्त महाराष्ट्राचे महासचिव असताना त्यांच्यासोबत काम. 2013 पर्यंत शशी थरुर हे सर्वाधिक ट्विटर फॉलोअर असलेले भारतीय होते. 2013 मध्ये नरेंद्र मोदींनी त्यांना मागे टाकलं.
मल्लिकार्जुन खर्गे - कर्नाटकमधल्या गुलबर्गा मतदारसंघाचे माजी खासदार 2019 ला मात्र पराभूत झाले. 2014 ते 19 या काळात लोकसभेत काँग्रेसचे गटनेते. यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणूनही काम पाहिले. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री, कर्नाटक काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं. 2018 ते 2020 या काळात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी, महाविकास आघाडीच्या स्थापनेतही त्यांचा वाटा आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यानंतर आता खर्गे राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद लागू व्हायला हवं यासाठी राहुल गांधी आग्रही आहेत. गहलोतांनाही हाच न्याय लागू करण्यात आला होता. त्यामुळेच राजस्थानात सगळा ड्रामा घडला. आता राज्यसभेतलं हे पद दिग्विजय सिंह यांना मिळणार का याची उत्सुकता आहे.
खर्गे कर्नाटकातले तर थरुर केरळचे त्यामुळे कुणीही अध्यक्ष झाले तरी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष 26 वर्षानंतर पुन्हा दक्षिण भारतातला असणार हे स्पष्ट आहे. याआधी पी व्ही नरसिंहराव हे 1991 ते 96 या काळात अध्यक्ष होते. नव्या अध्यक्षांच्या काळात काँग्रेसची पडझड किती थांबते हे पाहणंही महत्वाचं असेल.
संबंधित बातम्या :
Congress President Election : दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत, मल्लिकार्जुन खर्गेंसाठी माघार