Congress President Election : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि खासदार शशी थरुर ( shashi tharoor) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी  (Congress President Election) उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही नेत्यांनी काँग्रेस मुख्यालयात आज (30 सप्टेंबर) अर्ज दाखल केले. मल्लिकार्जुन खर्गे यांचा अर्ज दाखल करताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी, पवन बन्सल, आनंद शर्मा, भूपेंद्रसिंग हुड्डा, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, अविनाश पांडे, मनीष तिवारी हे नेते उपस्थित होते. दरम्यान, शशी थरुर हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतील असा मला विश्वास असल्याचे मत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केले.


मी जिंकेन : मल्लिकार्जुन खर्गे 


दरम्यान, 'मला पाठिंबा देणारे सर्व नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचे मी आभार मानतो. 17 ऑक्‍टोबरला निकाल काय लागतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, मी जिंकेन अशी आशा असल्याचे मत मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केलं.


 






अशोक  गेहलोत आणि दिग्विजय सिंह यांच्या नावाची जोरदार चर्चा 


काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, राजस्थानमधील राजकीय उलथापालथीनंतर गेहलोत यांचे नाव वगळण्यात आले. यानंतर दिग्विजय सिंह यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले होते.  आपण उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती देखील  दिग्विजय सिंह यांनी दिली होती. त्यानंतर 24 तासांत चित्र बदलले. खर्गे यांचे नाव पुढे आल्यानंतर  दिग्विजय सिंह यांनी आपला दावा मागे घेतला आहे. खर्गे यांना समर्थन देत असल्याची माहिती  दिग्विजय सिंह यांनी दिली आहे.


शशी थरुर यांनी महात्मा गांधी आणि राजीव गांधींना वाहिली आदरांजली


दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खासदार शशी थरुर यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मारकालाही त्यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी एक ट्वीट केलं आहे. 'भारत एक जुना पण तरुण देश आहे. भारताने मजबूत, स्वतंत्र, स्वावलंबी आणि जगातील सर्व राष्ट्रांच्या सेवेत पुढे जावे असे  स्वप्न मी पाहत असल्याचे थरुर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आता  निर्णय वरुन नाही तर तर जिल्हा पातळीवरून घेण्याची वेळ आली आहे. पूर्वीचे निर्णय वरुन होत होते. यावेळी खंबीर नेतृत्वाची गरज आहे, मी अध्यक्ष झालो तर खंबीर नेतृत्व देण्याचा प्रयत्न करेन, असे मत थरुर यांनी व्यक्त केलं. गांधी घराण्याने आपण कोणालाच पाठिंबा देत नसल्याचे सांगितल्याचे थरुर म्हणाले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जी-23 तुमच्यासोबत आहे का? असा प्रश्न थरुर यांनी विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, वैयक्तिक क्षमतेच्या जोरावर मी लढवत आहे. तुम्ही त्यांना प्रश्न विचारा असेही ते म्हणाले.


 






अर्ज दाखल करण्याचा आज ​​शेवटचा दिवस


काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज (30 सप्टेंबर) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आठ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 19 ऑक्टोबरला अध्यक्षपदाचा निकाल जाहीर होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Congress President Election : दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत, मल्लिकार्जुन खर्गेंसाठी माघार