Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा (LoP in Rajya Sabha)राजीनामा दिला आहे.  एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार खरगेंनी हा राजीनामा दिला आहे. दरम्यान खरगे यांची अध्यक्षपदासाठी दावेदारी मजबूत मानली जात आहे. त्यांनी काल काँग्रेस अध्यक्षपदाचा अर्ज भरल्यानंतर आज राज्यसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. आता राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस कुणाकडे सोपवणार याची उत्सुकता देखील लागली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी पी चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश यांची नावे चर्चेत आहेत.


राजीनामा दिल्यानंतर खर्गे म्हणाले की, काँग्रेसच्या एका नेत्याच्या एका पदाच्या नियमानुसार आपण हा निर्णय घेतला आहे. खरगे यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात पक्षात कोणत्याही व्यक्तीला दोन पदे भूषवता येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला होता.  


खरगे काँग्रेसचे पुढील अध्यक्ष होऊ शकतात


मल्लिकार्जुन खडके हे पक्षाचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. खरगे यांनी 30 सप्टेंबर रोजी अर्ज दाखल केला, त्यानंतर आता 17 ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. खरगे यांच्या विरोधात काँग्रेस नेते शशी थरूर आहेत. खरगे यांना गांधी घराण्याकडून झुकतं माप असल्याचे सांगितले जात असल्यानं त्यांचा विजय होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यांनी नामनिर्देशन केले तेव्हा त्यांच्यासोबत 30 प्रस्तावक उपस्थित होते.


खरगे यांचा उमेदवारी अर्ज भरताना जी 23 गटातले भूपिंदर सिंह हुड्डा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे खरगे हेच पक्षातले सर्व सहमतीचे उमेदवार मानले जात आहेत.  दक्षिण भारतातल्या ज्या एकमेव राज्यात भाजपची स्थिती मजबूत आहे त्या कर्नाटकमधून खर्गे येतात. कर्नाटकमध्ये लवकरच निवडणुकाही होणार आहेत. 


उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. कर्नाटकमधल्या गुलबर्गा मतदारसंघाचे माजी खासदार 2019 ला मात्र पराभूत झाले.  2014 ते 19 या काळात लोकसभेत काँग्रेसचे गटनेते. यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणूनही काम पाहिले. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री, कर्नाटक काँग्रेसचं अध्यक्षपदही  भूषवलं.  2018 ते 2020 या काळात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी, महाविकास आघाडीच्या स्थापनेतही त्यांचा  वाटा आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे, थरुर यांच्याशिवाय झारखंडचे माजी मंत्री के एन त्रिपाठी यांनीही अर्ज भरलेला आहे. आता 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.


संबंधित बातम्या :


Congress President Election : दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत, मल्लिकार्जुन खर्गेंसाठी माघार