5G in Network : देशात आज 5G इंटरनेट सुविधेला (5G Internet Service) सुरुवात होत आहे. सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येईल. भारतात आजपासून 5G इंटरनेट सेवा सुरु होणार असून मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.


देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा


आजपासून देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. यामध्ये राज्यातील दोन शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. देशात 5G सेवादेखील 4G सेवेप्रमाणे टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 शहरातून 5G सेवा सुरू करण्यात येईल.


देशातील ज्या 12 शहरांची निवड सुरुवातीला 5G सुविधेसाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. पुण्यातील सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, डाटा ऑपरेटर्स, आय. टी. इंजिनियर्स, इंडस्ट्रलिस्ट आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अशा सर्वांकडून या 5G इंटरनेट सेवेचं स्वागत करण्यात येत आहे. 5G इंटरनेट सेवेमुळे सर्वांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.


5G तंत्रज्ञानाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा 


तज्ज्ञांच्या मते, 5G तंत्रज्ञानाचा भारताला खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर 5G नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.




भारताची विकसित देश बनण्याच्या दृष्टीने वाटचाल

सध्या भारत जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारत आता अमेरिका (America), चीन (China), जपान (Japan) आणि जर्मनी (Germany) या देशांनंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. विशेष म्हणजे या आधी पाचव्या क्रमांकावर ब्रिटन होता. पुढच्या काही वर्षांमध्ये या क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठी 5G इंटरनेट सेवेचा मोठा फायदा होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.