काँग्रेसजणहो... शिस्त पाळा, एकत्रित या!; सोनिया गांधींचे नेत्यांना आवाहन
Congress Meeting : काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली असून त्यामध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन पक्ष संघटनेसाठी काम करण्याच्या सूचना काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी दिली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांनी पक्ष शिस्त पाळावी, एकत्र यावं, वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन पक्ष संघटनेसाठी काम करावं असं आवाहन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.
काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी नेत्यांना खडेबोल सुनावलेत. काँग्रेस मुख्यालयातून मांडल्या जाणाऱ्या भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाहीत असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खोटेपणाचा पर्दाफाश करा असं आवाहनही त्यांनी केलंय. भाजप-संघाच्या द्वेषाच्या विचारधारेचा सामना करायचा आहे असंही त्यांनी नेत्यांना सांगितलंय.
अनेक धोरणात्मक बाबींवर आपल्याच नेत्यांमध्ये वैचारिक गोंधळ असल्याचंही सोनिया यांनी म्हटलंय. काँग्रेस पक्षात शिस्त आणि एकी आवश्यक आहे आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा सोडून संघटनेसाठी काम करण्याचा सल्ला सोनिया गांधी यांनी दिलाय.
सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून ऑक्टोबर 2022 पर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल आणि पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल. 16 ऑक्टोबरलाही पक्षाच्या नेत्यांची एक मीटिंग घेण्यात आली होती. त्यामध्ये बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, "काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी व्हावी असं सर्वांनाच वाटतं. पण त्यासाठी पक्षाचे हित सर्वोतपरी मानत आपण एकी बाळगणं आवश्यक आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्पष्टता हवी. त्याचं वेळापत्रक आजच आपल्याला मिळेल. मनमोकळ्या संवादाचं कायमचं मी समर्थन केलंय. पण माझ्यापर्यंत एखादी गोष्ट पोहचवण्यासाठी कुणी माध्यमांचा वापर करु नये."
महत्वाच्या बातम्या :