Congress News : उद्यापासून उदयपूरमध्ये काँग्रेसचं चिंतन शिबिर, 430 प्रतिनिधी राहणार उपस्थित
राजस्थानमधील उदयपूरमध्ये उद्यापासून काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हे चिंतन शिबीर होणार आहे.
Congress News : प्रदिर्घ काळानंतर काँग्रेसचे चिंतन शिबीर होणार आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये उद्यापासून (13 मे) काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत हे चिंतन शिबीर होणार आहे. या शिबिरात काँग्रेसचे 430 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस संघटना मजबूत करण्यावर या शिबिरात चर्चा होणार आहे.
दरम्यान, उद्यापासून सुरु होणाऱ्या चिंतन शिबिराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व तयारी केली आहे. या शिबिरात महत्त्वाचे मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसकडून यापुढे आता एक परिवार, एक तिकीट असा फॉर्म्युला राबवला जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते. महत्वाचं म्हणजे या निर्णयाची अमलबजावणी ही गांधी परिवारापासून सुरु होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच दुर्बल घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्या संदर्भातही काही निर्णय होण्याची शक्यता आहे. या शिबिरात पक्षाध्यक्षपदाबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष निश्चितच काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांचे भाषण
काँग्रेस चिंतन शिबिरमधील राजकीय प्रस्तावासह देशातील ध्रुवीकरणाचे वातावरण, राष्ट्रीय सुरक्षा, केंद्र-राज्य संबंध, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येचे मुद्दे तसेच युतीच्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. विचारमंथनानंतर तयार होणाऱ्या प्रस्तावावर 15 मे रोजी सकाळी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत (CWC) शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर दुपारी राहुल गांधी यांचे भाषण होईल आणि त्यानंतर पक्षाध्यक्षांच्या समारोपाच्या भाषणानंतर पक्षाकडून चिंतन शिबिराचे ठराव जाहीर केले जातील. चिंतन शिबिरात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी चेतक एक्स्प्रेसने उदयपूरला जाणार असून त्यांच्यासोबत पक्षाचे सुमारे 60 नेतेही रेल्वेने प्रवास करणार आहेत.
काँग्रेसचे तब्बल 19 वर्षांनंतर अशा प्रकारचे चिंतन शिबिर
आम्ही जे मुद्दे मांडले आहेत, त्यावर चिंतन शिबिरात निर्णय होणे अपेक्षित असल्याचे काँग्रसचे नेते मनीष तिवारी यांनी सांगितले. तब्बल 19 वर्षांनंतर काँग्रेस अशा प्रकारचे चिंतन शिबिर करत आहे, हे चांगले आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. 2024 मध्ये काँग्रेसला बळकटी मिळावी यासाठी ते सर्व मुद्दे चिंतन शिबिरात मांडले जातील असेही तिवारी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Congress : काँग्रेसचा नवा फॉर्म्युला, 'एक परिवार, एक तिकीट'; सुरुवात गांधी घराण्यापासून होण्याची शक्यता
- Pandharpur: काँग्रेसचे नेते गर्भगळीत आणि कणा नसलेले, ते सोनियांचे ऐकतात की पवारांचे हा प्रश्न: प्रकाश आंबेडकर