Temperature in India: सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. अनेक ठिकाणी पर्वतांवर बर्फवृष्टी देखील सुरू आहे. राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये तापमान उणे झाले आहे. राजस्थानमधील फतेहपुर येथे प्रथमच तापमान हे उणे 5.2 वर पोहोचले आहे. तसेच अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली असून, रस्ते देखील धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना अडचणी येत आहेत. तापमान हे उणे झाल्यामुळे पाण्याचा बर्फ होत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे.


देशाची राजधानी असलेल्या दिल्लीबरोबरच पंजाब, हरियणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये तापमान उणे झाले आहे. दिल्लीमध्ये किमान तापमान हे 3.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर कमाल तापमान हे 21 डिग्री सेल्सिअस असल्याची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे दिल्लीमध्ये प्रदुषणाची पातळी वाढत असतानाचं, नागरिकांना कडाक्याच्या थंडीला देखील सामोर जावं लागत आहे. महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका वाढला आहे. खासकरुन विदर्भात थंडीची जोरदार लाट आहे. नागपुरात किमान तापमान हे 7.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने आणखी थंडी वाढण्याचा इशारा दिला आहे.


 





उत्तर काशीतील उंच भागात तर थंडीने कहरच केला आहे. उंचावरील हर्षिल, सुखी टॉप, मुखवा, गंगोत्री या भागात तापमान हे उणे 0 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. या ठिकाणी पाण्याच्या पाईमध्ये बर्फ झाला होता, एवढी थंडीची लाट येथे आली आहे. उष्णतेसाठी ओळखले जाणारे राजस्थानमध्ये जोराची थंडी आहे. तेथील झाडांवर बर्फवृष्टी झाल्याचे चित्र आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी पारा उणेपर्यंत पोहोचला आहे. शेतातील पिकांवर बर्फाची चादर पसरल्याचे दिसत आहे. सीकरमधील तापमान हे उणे 2.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. फतेहपूर शेखावती येथील थंडीने आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पहिल्यांदाच पारा उणे 5 अंशांच्या खाली पोहोचला. याआधी सर्वात थंड दिवस हा 30 डिसेंबर 2014 रोजी उणे 4.6 इतका नोंदवला होता. मात्र, यावेळी तापमान उणे 5.2 वर पोहोचले आहे.


वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांना अडचणी
एवढ्या कडाक्याच्या थंडीमुळे शेतकर्‍यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यांना पिकांना पाणी देखील देता येत नाही. कारण पाण्याच्या पाईपलाईनमध्ये देखील बर्फ पडला आहे. पाईपच्या आतील पाणी आणि पाईपच्या वरचा बर्फ देखील गोठलेला आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत.


जम्मू काश्मीरमध्ये थंडीने 23 वर्षाचा विक्रम मोडला
लडाखमध्ये थंडीमध्ये नदीचे पाणी देखील गोठले आहे. नदीवर नजर जाईल तिथपर्यंत फक्त बर्फच दिसत आहे. गोठलेली नदी दिसायला खूप छान दिसते, पण इथे राहणाऱ्या लोकांसाठी ही एक मोठी समस्या आहे. सर्वात मोठी समस्या ही पिण्याच्या पाण्याची निर्माण झाली आहे. याशिवाय जेवण तयार करतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे कामांना विलंब होत आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही वाढले असून, नागरिकांना तोटा सहन करावा लागत आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 23 वर्षाचा थंडीचा विक्रम मोडला आहे. थंडीमुळे दाट धुके परसले असल्याने लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. तिथे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबादचे तापमानही 0.5 अंशावर पोहोचले आहे. मध्यप्रदेशातील रायसेनचे तापमान 2.5 अंशांवर  पोहोचले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: