Stock Market Opening: सोमवारी मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यानंतर आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. बीएसईचा 30 स्टॉकचा सेन्सेक्स वधारला असून 600 अंकांनी वधारला आहे. तर, निफ्टीतही जवळपास 150 अंकांनी वधारला आहे. मेटल आणि आयटी क्षेत्रात चांगली खरेदी झाल्याचे दिसून आले. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्सने 400 अंकाची उसळण घेतली. 

Continues below advertisement


सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. एकाच दिवसात जवळपास 9 लाख कोटींचा चुराडा झाला होता. ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या, लॉकडाउनची टांगती तलवार, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी केलेली विक्री आदी कारणांमुळे बाजारात घसरण झाल्याचे म्हटले जाते. 


मंगळवारी देखील बाजार सुरू होण्याआधी गुंतवणुकदार धास्तावले होते. मात्र, सकाळच्या सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली. सकाळी 10.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 850 अंकांनी वधारून 56,672 अंकावर पोहचला होता. तर, निफ्टीदेखील 252 अंकांनी वधारून 16,866 अंकावर पोहचला होता. निफ्टीमधील 50 पैकी 49 स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांकातही तेजी दिसून आली. सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी बाजार चांगलाच वधारला. 


निफ्टीमधील धातू, सार्वजनिक बँक, रियल्टी आणि कंझ्यूमर ड्यूरेबल्समध्ये दोन ते 2.25 टक्क्यांदरम्यान ट्रे़डिंग सुरू आहे. त्याशिवाय आयटी क्षेत्रातही तेजी दिसून आली. 


 





आशियाई बाजारात काय स्थिती?


आज आशियाई शेअर बाजारामध्ये सोमवारपेक्षा मंगळवारी चांगली परिस्थिती दिसून येत आहे. जपानच्या निक्केई दोन टक्क्यांनी वधारला आहे. तर, हँगसेंग हा 0.88 टक्क्यांनी वधारला आहे. तैवान इंडेक्समध्ये 0.54 टक्क्यांनी वधारला आहे. कोरिया आणि चीनच्या कम्पोजिटचे निर्देशांक वधारले असल्याचे दिसून आले. 


दरम्यान सोमवारी, शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चा अनुभव आला. एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रुपयांचा चुराडा झाला आहे. सेंसेक्समध्ये तब्बल 1189 अंकांची म्हणजे 2.09 टक्क्यांची घसरण झाली. तर निफ्टीमध्येही 371 अंकांची म्हणजे 2.18 टक्क्यांची घसरण झाली. जगभरातल्या विविध शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या घसरणीचा परिणाम मुंबई शेअर मार्केटवरही झाल्याचे दिसून आले.