लेह : एलएसीनजीक सध्या भारतीय सैन्य चीनच्या सैन्यावर आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून आहे. भारतीय सैन्यातील काही विश्वासार्ह सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच चीनचं सैन्य एलएसीनजीक असणाऱ्या त्यांच्या विविध हवाई तळांवर युद्धाभ्यास करताना दिसलं. यामध्ये चीनच्या तब्बल 24 हून अधिक लढाऊ विमानांचा सहभाग होता. यामध्ये जे 11 आणि जे 16 ही सहभागी होते. 


सूत्रांच्या माहितीनुसार चीनच्या सैन्यानं तिबेट आणि शिनजियांग प्रांतात आपल्या विविध हवाई तळावंर हा युद्धाभ्यास केला. यामध्ये होटान, गर गुंसा, कासगर, हॉपिंग, डोंगा- झोंग, लिंझी आणि पनगट या हवाई तळांचा समावेश होता. लढाऊ विमानांसह या युद्धाभ्यासात चीनचं लष्करही सहभागी झालं होतं असं सांगण्यात येत आहे. कोणा दुसऱ्या देशाची लढाऊन विमानं यादरम्यान, चीनच्या हद्दीत आलीच तर, त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी इथं लष्कराची उपस्थिती पाहायला मिळाली. 


Himalayas : अंतराळातून असा दिसतो पर्वतराज हिमालय; दृश्य पाहून नेटकरी अवाक्


चीनच्या सैन्यानं त्यांच्यात हवाई तळांवर युद्धाभ्यास केला असला तरीही त्यांच्या प्रत्येक हालचालीवर भारताकडून मात्र करडी नदर ठेवण्यात येत आहे. भारतीय वायुदलाचे मिग 29 यांची एक संपूर्ण तुकडी लेह- लडाखमध्ये तैनात करण्यात आली आहे. याशिवाय राफेल लढाऊ विमानंही नियमित स्वरुपात लडाखच्या हवाई तळांवरुन घिरट्या घालत आहे. 


हल्लीच वायुदल प्रमुख, आरकेएस भदौरिया यांनी लेह- लडाखचा दौरा करत वायुदलाच्या कार्यवाहीवर नजर टाकली. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा झालेल्या असतानाही हा वाद काही केल्या निवळताना दिसत नाही आहे. त्यामुळं खुरापती चीनवर भारतीय सैन्य नजर ठेवण्यात तसूभरही हलगर्जीपणा करताना दिसत नाहीये.