नवी दिल्ली : खासगी रुग्णालयांमधील कोरोना लसीच्या दराबाबत मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. यानुसार, ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रजेनिकाच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक-व्ही या लसींसाठी खासगी रुग्णालयांना जीएसटी आणि सेवा करासहित निश्चित रकमेपेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही. कोविशिल्ड लसीला जास्तीत जास्त 780 रुपये, कोवॅक्सिनसाठी 1410 रुपये आणि स्पुतनिक लसीसाठी 1145 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.


सेवा शुल्क 150 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही


आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना 8 जून रोजी देण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले आहे की सर्व लसी उत्पादकांना खासगी रुग्णालयांच्या लसीची किंमत जाहीर करावी लागेल. त्यात काही बदल झाल्यास त्याची माहिती अगोदरच द्यावी लागेल. खासगी रुग्णालये एकाच डोससाठी सेवा शुल्क म्हणून जास्तीत जास्त 150 रुपये आकारू शकतात. राज्य सरकार या किंमतींवर नियंत्रण ठेवू शकतात.


आरोग्य मंत्रालयाने पुढे सांगितले की, कोविशिल्ड लस उत्पादक कंपनीने तिची किंमत 600 रुपये जाहीर केली आहे. यात 30 रुपये जीएसटी आणि सेवा शुल्क 150 रुपये जोडल्याने एकूण किंमत 780 रुपये होते. त्याचप्रमाणे कोवॅक्सिन लस उत्पादक कंपनीने त्याची किंमत 1200 रुपये जाहीर केली आहे. पाच टक्के दराने 60 जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्क मिळून त्याची किंमत 1410 रुपये झाली आहे. तर स्पुतनिक-व्ही लसीची किंमत 948 निश्चित केली आहे. यात जीएसटी 47.40 रुपये जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्क मिळून त्याची एकूण किंमत 1145 रुपये होते.


कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या 44 कोटी डोसची ऑर्डर


केंद्र सरकारने मंगळवारी माहिती दिली की, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचे 44 कोटी लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहेत. एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की केंद्र सरकार राज्यांचा खरेदी कोटा ताब्यात घेईल आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोफत लस उपलब्ध करुन देण्यात येईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की कोविड लसींचे 44 कोटी डोस ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान उत्पादक पुरवतील.