नवी दिल्ली : चीनने पुन्हा भारतीय सीमेवर केलेली सैन्याची जमवाजमव हा कराराचा भंग असल्याचा आरोप भारताने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारताने हा चीनच्या सीमेवरील सैन्याच्या आणि शस्त्रास्त्रांच्या जमवाजमवीला हरकत घेतली आहे. मागच्याच आठवड्यातील हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर अनेक चर्चा झाल्या. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळत आहे, असं वाटत असतानाच चीनने पुन्हा सीमेपलीकडे सैन्याची आणि युद्धसाहित्याची आवक वाढवली आहे.


रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी मिळवलेल्या उपग्रहाने काढलेल्या या परिसराच्या फोटोनुसार, चीनने या परिसरात एक तळ उभारला आहे. चीनी सैन्याचा हा तळ गलवान खोऱ्यात जिथे भारत आणि चीन यांच्यात चकमक झाली त्याच ठिकाणी असल्याचं स्पष्ट दिसतं. उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रात काही तंबू दिसतात, त्याखाली काही बांधकाम सुरु असावं असा संशय रॉयटरच्या बातमीत व्यक्त करण्यात आला आहे. कारण या सॅटेलाईटद्वारे काढलेल्या या चित्रात बांधकामाच्या ठिकाणी असतात तशा भिंती आणि बॅरिकेट्स असल्याचंही दिसत असल्याचं बातमीत म्हटलं आहे.


चीन आणि भारत यांच्यात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच LAC च्या चीनकडील बाजूला गेल्या महिनाभरापासून चीनने सैन्य आणि युद्ध साहित्याची आवक वाढवली आहे. चीन आणि भारत यांच्यातील सीमा निश्चित नसल्यामुळे चीनकडून अनेकदा भारतीय हद्दीतल्या ठिकाणांवर अतिक्रमण होत आहे.


1993 साली दोन्ही देशात झालेल्या द्वीपक्षीय करारानुसार, दोन्ही देशांना सीमेवर एका मर्यादेपेक्षा जास्त सैन्य जमा करता येत नाही.


गेल्या आठवड्यातील हिंसक झटापटीत 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत-चीन यांच्यातील सीमेवर बराच तणाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून कोणीच कोणाच्या भूमीवर आक्रमण केलं नसल्याची माहिती दिली होती. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचं चीनमधील प्रसारमाध्यमांनी स्वागत केलं.


एकूणच चीन-भारत तणावावरुन वातावरण तापलेलं आहे.


चीनने सीमेपलिकडे मोठ्या प्रमाणात सैन्य गोळा केल्यामुळे भारतानेही त्याला प्रत्युत्तर आपल्या बाजूला सैन्य जमा केलं आहे. त्यानंतर गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले तरी चीनची किती हानी झाली हे अजून जाहीर करण्यात आलेलं नाही.


त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्हीके सिंह यांनी मात्र चीनचे सैनिकही आपल्या ताब्यात होते, मात्र आपण त्यांना सोडून दिलं असल्याची माहिती दिली.


संबंधित बातम्या




India-China Face Off | चीनची पुन्हा दगाबाजी, गलवान खोऱ्यात उभारले तंबू