रायपूर : कोरोना काळात नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसतात. मग अशा वेळी पोलिसांकडून दंडूका उगारला जातोय. पण काही वेळा प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांकडून आपल्या अधिकारांचा गैरवापर केला जातोय आणि निरापराध्यांना त्याचा फटका बसतो. असाच काहीसा प्रकार छत्तीसगडमध्यील सुरजपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी केलाय. आई-वडिलांसाठी मेडिकल स्टोअरमधून औषधं आणायला गेलेल्या युवकाला प्रिस्क्रिप्शन दाखवूनही मारण्यात आलं, त्याचा मोबाईल जिल्हाधिकाऱ्यांनी फोडला आणि त्याला कानशिलातही लावली. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सुरजपूर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी रणवीर शर्मा स्वत: शनिवारी दुपारी काय स्थिती आहे याची पाहणी करायला गेले होते. त्यावेळी रस्त्यावरुन जात असलेल्या एका युवकाला त्यांनी थांबवलं. त्या युवकाने प्रिस्क्रिप्शन दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याकडील मोबाईल घेतला आणि रस्त्यावर आपटून फोडला. त्यानंतर त्यांनी त्या युवकाला कानशिलात हाणली. एवढ्यावरही ते थांबले नाहीत तर पोलिसांना बोलावून त्या युवकाला मारायचे आदेश दिले. पोलिसांनी साहेबांच्या आदेशाचे पालन केले आणि त्या युवकाला बदडलं. यामुळे त्या युवकाच्या पायावर गंभीर जखम झाल्याचं समजतंय.
संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या जिल्हाधिकाऱ्यांच्या अरेरावीवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता या जिल्हाधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकारावर माफी मागितल्याचं समजतंय.
या घटनेवर संबंधित युवकाच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीला काही औषधांची गरज होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला बाहेर पाठवल्याचं सांगितलं. छत्तीसगडमध्ये 31 मे पर्यंत लॉकडाऊन असलं तरी अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. अशा वेळी एका जिल्हाधिकाऱ्यांनेच लोकांवर अरेरावी सुरु केल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.
महत्वाच्या बातम्या :