कोलकाता : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचं 25 मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता, असून 26 मे रोजी ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्यानं यासंदर्भातील ही माहिती दिली.  


बंगालच्या खाडी परिसरात चक्रीवादळसदृश्य परिस्थिती पाहता हवामान खात्यानं ओडिशा येथील किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 'यास'  (Yaas ) हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यास प्रशासनाला पूर्ण तयारीनिशी संकटाशी दोन हात करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


Barge P 305 Timeline : 'त्या' दिवशी नेमकं काय आणि कसं घडत गेलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम 


हवामान खात्याच्या माहितीनुसार... 


'22 मे च्या सकाळपासूनच बंगालच्या उपसागराच्या पूर्वमध्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि बांगलादेश या भागांतून हा पट्टा 26 मे च्या सायंकाळी पुढे सरकेल', असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं. सध्या या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढत असल्याचीही माहिती समोर आली आहे.


पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये या चक्रीवादळाच्या तीव्रतेसंदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. हे संभाव्य संकट पाहता प्रशासन भारतीय नौदलाशी समन्वय साधत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला चक्रीवादळाचा इशारा पाहता इथं एनडीआरएफची 17 पथकं, ओ़डीआरएफच्या 20 बटालियन आणि फायर सर्विसच्या 100 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात असल्याचं कळत आहे. 


हवामान खात्यानं दिलेल्या पूर्वसुचनेनुसार 26 मे पर्यंत सकाळच्या सुमारास हे चक्रीवादळ ओडिशा- पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकू शकतं. ज्यामुळं या भागात मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.