Satara Lockdown : सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू असला तरी, कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. 


सातारा जिल्ह्यातही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 25 मेपासून ते 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 24 मे रोजी रात्री 12 वाजता लॉकडाऊन सुरु होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, लॉकडाऊन काळात भाजीपाला, फळ मार्केट, किराणा विक्री, उपहारगृह, बार, लॉज सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः राहणार बंद आहेत. तसेच लग्न आणि अंत्यविधीला जाणासाठी आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक असणार आहे. त्याचसोबत लसीकरण झाल्याचं प्रणाणपत्रही बंधनकारक असणार आहे. 


लॉकडाऊन दरम्यान, काय सुरु काय बंद? 


भाजी मार्केट, फळ मार्केट, बेकरी दुकाने बंद
आठवडी आणि दैनंदिन बाजारासह फेरीवाल्यांनाही बंदी
उपहारगृह, बार लॉज, हॉटेल, रिसॉर्ट, मॉल बंद
वाईन शॉप, बिअर शॉप, देशी दारू दुकाने बंद शिवाय घरपोच सेवाही बंद
मटन, चिकन, अंडी, मासे विक्री बंद
सर्व किराना दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा बंद
गॅरेज, स्पेअरपार्ट दुकाने बंद
खाजगी आणि सहकारी अशा सर्व बँका बंद
सर्व बांधकाम बंद
बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर मारला जाणार शिक्का
प्रवासातून आलेल्याला 14 दिवस गृह विलगीकरणात ठेवणे बंधनकारक असेल
अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांव्यतरिक्त कोणालाच आता पॅट्रोल डिझेल मिळणार नाही
सकाळी  7 ते 9 वृत्तपत्र आणि दूध फक्त घरपोच


राज्यात शनिवारी 40,294 रुग्ण बरे होऊन घरी, 26,133 नव्या रुग्णांची नोंद


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. काल (शनिवारी) 40,294 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 26,133 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 51,11,095 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.04% एवढे झाले आहे.


राज्यात काल 682 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,27,23,361 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,53,225 (16.97 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 27,55,729 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 22,103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज एकूण 3,52,247 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :