Dantewada News: छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात बुधवारी (26 एप्रिल) झालेल्या भूसुरुंग स्फोटात 11 जवान शहीद झाले. यामध्ये 10 जिल्हा राखीव रक्षक (डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड, DRG) आणि एका चालकाचा समावेश होता. नक्षली हल्ल्यानंतर बस्तर (Bastar) विभागातील सर्व सात जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाहनांच्या वापराबाबतही आयजींनी नवे आदेश जारी केले आहेत. सुरक्षा दलांना वाहनांचा वापर करताना सतर्क राहण्यास सांगितले आहे. नक्षलवाद्यांनी टाकलेल्या भूसुरुंगांचा शोध घेऊन त्यापासून सावध राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.


बस्तर विभागातील सात जिल्ह्यांना हाय अलर्ट


दंतेवाडा येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बस्तर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना (एसपी) हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी हे आदेश जारी केले आहेत. बस्तर विभागात कांकेर, कोंडागाव, नारायणपूर, बस्तर, दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. या सातही जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


मार्च ते जूनच्या मध्यापर्यंत म्हणजेच ऐन उन्हाळ्यात, नक्षलवादी टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन (TCOC) चालवतात आणि याअंतर्गत मोठ्या घटना (हल्ले, स्फोट) घडवण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वीही या काळात सुरक्षा दलांवर अनेक हल्ले झाले आहेत.


मुख्यमंत्री वाहणार जवानांना श्रद्धांजली


पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास आणि नक्षलविरोधी कारवाया तीव्र करण्यास सांगितले आहे. दंतेवाडा येथील पोलीस लाईनमध्ये सकाळी 11 वाजता शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) उपस्थित राहणार आहेत. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पाठवले जाणार आहे.


नक्षलवादी हल्ल्यात 11 जवान शहीद


दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी बुधवारी दुपारी सुरक्षा दलाच्या ताफ्यात सामील असलेल्या एका वाहनाला उडवले. या घटनेत 10 पोलीस कर्मचारी आणि एका चालकाचा मृत्यू झाला.


हल्ल्यात ठार झालेले जवान जिल्हा राखीव रक्षक (राज्य पोलिसांचे नक्षलविरोधी युनिट) चे सदस्य होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. शहीद झालेल्या जवानांपैकी आठ हे दंतेवाडा जिल्ह्यातील रहिवासी होते, तर दुसरे शेजारील सुकमा आणि विजापूर जिल्ह्यातील रहिवासी होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शहीद जवान नक्षलवाद सोडल्यानंतर सुरक्षा दलात दाखल झाले होते. बस्तर भागातील बहुतांश तरुणांना डीआरजी (DRG) मध्ये दाखल करण्यात आले आहे. ही टीम नक्षलवाद्यांशी लढण्यात तज्ज्ञ मानली जाते. आत्मसमर्पण केलेल्या काही नक्षलवाद्यांचाही या नक्षलविरोधी टीममध्ये समावेश आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nagpur News : कर्करोगाच्या रुग्णांना संजीवनी देणारी संस्था, नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण, जाणून घ्या NCI चं महत्त्व