Dantewada IED Blast: छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी) च्या जवानांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. आयईडी ब्लास्टमध्ये (IED Blast) तब्बल 11 जवान शहीद झाले आहेत. 


अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरनपूर पोलीस ठाण्यांतर्गत माओवादी कॅडरची उपस्थिती असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. आज दंतेवाडा येथून नक्षलविरोधी अभियानासाठी डीआरजी दल पाठवण्यात आलं होतं. डीआरजी पथक परतत असताना अरनपूर रस्त्यावर आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात 10 डीआरजी जवान आणि ऑपरेशनमध्ये सहभागी एक ड्रायव्हर शहीद झाला. 






नक्षलवाद्यांकडून आयईडी ब्लास्ट 


मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहानांवर आयईडी ब्लास्ट केला. डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्डला गुप्त माहिती मिळाली होती. एका ठिकाणी नक्षलवाद्यी येणार असल्याची माहिती मिळाली होती. तसेच, त्यामध्ये नक्षल्यांचे कमांडरही असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल रवाना करण्यात आलं होतं. त्याचवेळी नक्षलींनी जवानांच्या वाहानांवर आयईडीनं निशाणा साधला. नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये 10 डीआरजीच्या जवानांसह एका ड्रायव्हरचा समावेश आहे. 


नक्षलींसोबत दया दाखवली जाणार नाही : भूपेश बघेल


नक्षलवादी हल्ल्यानंतर छत्तीसगढचे (Chhattisgarh News) मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, "हे अत्यंत दुःखद आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. नक्षलवाद्यांना सोडलं जाणार नाही. अजिबात दया दाखवली जाणार नाही."


गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री बघेल यांच्याशी चर्चा 


नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली आहे. शाह यांनी राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.