श्रीहरीकोटा : इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan 3) आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. आज चांद्रयान-3 चंद्रापासून 30 किलोमीटर अंतरावर पोहोचलं आहे. यानंतर चांद्रयाननं चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवले आहेत. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने अवकाशातून चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो काढले असून ते इस्रोला पाठवले आहेत. यामध्ये चंद्राचा पृष्ठभाग स्पष्टपणे दिसत आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केल्यानंतर चंद्राचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो लँडर इमेजरने टिपला आहे. हा फोटो विक्रम लँडर इमेजरमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेरा-1 ने 17 ऑगस्ट रोजी कैद केला आहे.
30 किमी उंचीवून चंद्र कसा दिसतो पाहा फोटो
चांद्रयान-3 नं पाठवला चंद्राचा फोटो
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची चंद्र मोहिम आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. चांद्रयान-3 चा विक्रम लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटर अंतरावर पोहोचलं असून आता याचा वेग कमी-कमी होत जाईल. त्यानंतर विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल.
चांद्रयान-3 चा 40 दिवस, 3.84 लाख किमीचा प्रवास
14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3 एलव्हीएम-3 (LVM-3) रॉकेटद्वारे अवकाशात झेपावलं. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर, चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणं हे चांद्रयान-3 मोहिमेचं पहिलं लक्ष्य आहे. याआधीचा चांद्रयान-2 द्वारे चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर इस्रो पुन्हा चार वर्षानंतर चंद्रावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करणार आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होईल.
चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यावर पुढे काय होईल?
चांद्रयानमधील लँडरचं नाव 'विक्रम' आणि रोव्हरचं नाव 'प्रज्ञान' आहे. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. चांद्रयान-2 च्या लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागापासून 2 किमी आधी संपर्क तुटला होता. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :