दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्या निलंबनानंतर विशेष अधिकार समितीची बैठक संपन्न झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीर रंजन चौधरी यांना विशेष अधिकार समितीच्या पुढील बैठकीपूर्वी समोर बोलावण्यात येणार आहे. तसेच त्यांना त्यांची बाजू मांडण्याची देखील संधी देण्यात येणार आहे. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान संसदेत गदारोळ केल्याप्रकणी एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते.
समितीची पुढची बैठक 30 ऑगस्ट रोजी
शुक्रवार (18 ऑगस्ट) रोजी अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात जी तक्रार देण्यात त्यावर नियमांनुसार चर्चा करण्यात आली आहे. संसदेत गदारोळ केल्याचा अधीर रंजन चौधरी यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याच संदर्भात विशेष अधिकार समितीने सखोल चर्चा केली. याच पार्श्वभूमीवर विशेष अधिकार समितीची पुढची बैठक ही 30 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.
अधीर रंजन चौधरी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
संसदेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन सरकाराच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात केला होता. यावेळी त्यांनी मणिपूरच्या हिंसाचाराची तुलना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंधळ्या राजाची उपमा दिली होती. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं होतं की, 'धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून द्रौपदीचं वस्रहरण झालं होतं. आजही राजा आंधळा आहे. त्यामुळे जिथं राजाच आंधळा असतो तिथे द्रौपदीचं वस्रहरण होतचं मग ते हस्तिनापूर असो किंवा मणिपूर.' यानंतर त्यांना लोकसभा अध्यक्षांनी संसदेतून निलंबित केले होते.
यावर स्पष्टीकरण देताना अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं की, 'माझा हेतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याचा नव्हता.' दरम्यान संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकणात आता विशेष अधिकार समिती सखोल चौकशी करत आहे.
अधीर यांना समितीच्या पुढील बैठकीपूर्वी बोलावले जाऊ शकते. जिथे तो या प्रकरणी आपली बाजू मांडू शकतो. अधीर रंजन चौधरी यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकणात आता अधीर रंजन चौधरी यांच्या बाजूने निकाल लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.