श्रीहरीकोटा : भारत चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. आज चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं डिबुस्टिंग सुरु करण्यात आलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ पोहोचणार आहे. चांद्रयान-3 चंद्रापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर पोहोचणार आहे. त्यामुळे आता भारताच्या चंद्र मोहिमेसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. भारतासह अवघ्या जगाचं लक्ष इस्रोच्या चंद्रमोहिमेकडे लागलं आहे.
चांद्रयान-3 चंद्रापासून फक्त 30 किमी अंतरावर पोहोचणार
इस्रोचं चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणासह चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ मायलस्वामी अन्नादुराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्रिकम लँडर मॉड्यूलची डीबूस्टिंग प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाल्यानंतर चांद्रयान-3 चंद्रापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर असेल. त्यानंतर चांद्रयान-3 अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी स्वतःला तयार करेल. चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करेल.
शेवटच्या 30 किमी अंतरावर काय प्रक्रिया होईल?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या अध्यक्षांनी यापूर्वी चांद्रयान-3 च्या विविध टप्प्यांबाबत माहिती दिली होती, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, चांद्रयान-3 च्या लँडिंगचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे विक्रम लँडरचा वेग कमी करत त्याचं सऑफ्ट लँडिंग करणे. विक्रम लँडर 30 किमी उंचीवरून अंतिम लँडिंगपर्यंत आणण्याची प्रक्रिया फार महत्त्वाची आहे.
चांद्रयान-3 मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा
भारताला याआधी 2019 मध्ये चांद्रयान-2 मोहिमेला अपयश आलं होतं. कारण, लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकला नव्हता. आता भारताने पुन्हा महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतील असून त्यापासून फक्त काही पाऊलं दूर आहे. भारताची चंद्र मोहिम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरणार आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर पोहोचले आहेत.
40 दिवसांचा प्रवास
14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV मार्क 3 (LVM 3) रॉकेटद्वारे चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे.
'यावेळी' चांद्रयान चंद्रावर उतरणार
23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं होतं की, "जर सर्व काही ठीक पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल."