इंदूर : दोन कुत्र्यांमध्ये झालेल्या भांडणावरुन त्यांच्या मालकांमध्ये वाद झाले आणि याचं पर्यवसान गोळीबारात झालं, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Indore) ही धक्कादायक घटना घडली आहे. इंदूरच्या खजराना पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार घडला. राजपाल रजावत असं गोळीबार (Firing) करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.


कुत्रा फिरवण्यावरुन भांडण झालं अन्...


बँकेचा सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारा राजपाल रजावत हा गुरुवारी (17 ऑगस्ट) संध्याकाळी आपल्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेला होता. यावेळी त्याच्या कुत्र्याचे शेजारच्या घरातील कुत्र्यासोबत भांडण झालं. यातूनच कुत्र्यांच्या मालकांमध्ये वादाला सुरुवात झाली. बघता बघता भांडणं एवढं वाढलं की आरोपी राजपाल रजावत आपल्या घरात गेला. परवाना असलेली बंदूक घेऊन तो बाल्कनीत गेला आणि शेजारील घरावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या गोळीबारात शेजारी राहणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. मृत दोघे हे एकमेकांचे भावोजी आणि मेहुणा आहेत. राहुल वर्मा आणि विमल अमचा अशी त्यांची नावं आहेत.


बाल्कनीत उभा राहून अंदाधुंद गोळीबार


राजपाल राजावत गुरुवारी रात्री आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवत होता. यावेळी त्याच्या कुत्र्याचं शेजारच्यांच्या कुत्र्यासोब भांडण झालं. यावरुन दोन्ही कुत्र्याच्या मालकांमध्ये वाद झाला. काही राजपाल राजावत त्याच्या घरात गेला आणि पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीतून उभा राहून एकामागून एक गोळ्या झाडल्या, त्यात राहुल आणि विमल या दोघांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी दिली. खजराना पोलिसांनी या प्रकरणी राजपाल राजावत, त्याचा मुलगा आणि एका नातेवाईकाची आरोपी म्हणून नोंद केली आहे. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.






शेजारच्यांनी या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. गोळीबार होत असल्याचं पाहिल्यानंतर नागरिकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतलं. दरम्यान राजपाल रजावतचा दररोज शेजाऱ्यांसोबत वाद होत असतं. या वादाचं कारण कुत्राच असायचं. कॉलनीतील अनेकांनी त्यांना याबाबत समजावलं होतं, पण त्याच्या कोणताही परिणाम झालेला नाही.