श्रीहरिकोटा : भारत आता चंद्रापासून (Moon) काही अंतरच दूर आहे. चांद्रयान -3 (Chandrayan) हे दिवसागणिक यशस्वीरित्या चंद्राच्या आणखी जवळ जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवार (17 ऑगस्ट) रोजी विक्रम लँडर (Vikram Lander) हे यशस्वीरित्या प्रोप्लशन मॉडेलपासून वेगळे करण्यात आले. त्यामुळे आता इस्रोच्या (ISRO) शास्रज्ञांसह संपूर्ण देश आता चांद्रयान -3 च्या यशस्वी लँडिंगची वाट पाहत आहेत. तसेच येणारे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये विक्रम लँडरचा वेग कमी करुन त्याला लँडिंगसाठी तयार करण्यात येणार आहे.
रोवर चंद्रावर कधी लँड होणार?
प्रोप्लशन मॉडेलपासून वेगळं झाल्यानंतर आता मॉड्यूलमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर समाविष्ट आहे. त्यामुळे आता हे चंद्राच्या अगदी जवळच्या कक्षेमध्ये प्रवेश करण्यास तयार आहेत. यामुळे लँडर आणि रोवरला चंद्राच्या आणखी जवळ जाता येणार आहे. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान -3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास तयार असणार आहे. चांद्रयान -2 च्या तुलनेत चांद्रयान -3 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यामुळे चांद्रयान -3 सॉफ्ट लँडिंग करणं सहज शक्य होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.47 मिनिटांनी सॉफ्ट लँडिंग करणं सहज शक्य होणार आहे.
शेवटची प्रक्रिया सुरु होणार
लँडर वेगळे झाल्यानंतर या संदर्भातली माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटलं आहे की, विक्रम लँडर प्रोप्लशन मॉडेलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं आहे. शुक्रवार 18 जवळपास दुपारी चार वाजता विक्रम लँडरचा वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. यामुळे लँडर चंद्राच्या कक्षेच्या आणखी जवळ जाण्याची आशा आहे.
प्रोपल्शन मॉड्यूल देणार महत्त्वाची माहिती
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने प्रोपल्शन मॉड्यूलसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. यावर बोलतांना इस्रोने म्हटलं आहे की, प्रोपल्शन मॉड्यूल सध्या ज्या भागामध्ये त्या भागामध्ये ते काही महिने किंवा वर्ष फिरणार आहे. तसेच हे प्रोपल्शन मॉड्यूल अंतराळातील अनेक महत्त्वपूर्ण माहिती देखील पुरवत राहणार असल्याचं इस्रोकडून सागंण्यात आलं आहे.
2019 मध्ये सॉफ्ट लँडिंग झाले होते अयशस्वी
चांद्रयान-2 हे 2019 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यास अयशस्वी झाले होते. त्यानंतर इस्रोने पुन्हा एकदा चांद्रयान-3 ची मोहिम हाती घेतली. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करुन तिथे वैज्ञानिक प्रयोग करण्याचं या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे. जवळपास 600 कोटी रुपये खर्च करुन चंद्रयान-3 ला 14 जुलै रोजी यशस्वीपण प्रक्षेपित करण्यात आले होते.