Chandrayaan-3 Mission: चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरने (Chandrayaan-3) चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागाचे चार फोटो पाठवले आहेत. इस्त्रोने हे फोटो त्यांच्या ट्विटरवरून शेअर केले आहेत. त्या आधी आपण आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचलो असल्याचा संदेश केला होता.
बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनीटांनी इस्त्रोचे चांद्रयान लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. तर यशस्वी चंद्रमोहीम पार पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, चीन आणि रशियानंतर आता भारताचं नाव जोडलं गेलं आहे.
चांद्रयानाचा इस्त्रोला संदेश
चांद्रयान-3 नं चंद्रावर पोहोचताच इस्रोला खास मेसेज पाठवला आहे. इस्रोने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने ट्विट करत म्हटलं आहे की, ''चांद्रयान-3 मिशन : भारतीय, मी माझ्या मुक्कामापर्यंत (चंद्रावर) पोहोचलो आणि तुम्ही पण - चांद्रयान-3''. भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत पोहोचलं आहे. भारताने जणू चंद्रच कवेत घेतला, अशी भावना आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे शास्त्रज्ञ गेल्या चार वर्षांपासून चांद्रयान-3 उपग्रहावर काम करत होते. ज्या वेळी कोविड-19 महामारी देशात पसरत होती, त्या वेळी ISRO टीम भारताच्या मिशन मूनच्या तयारीत व्यस्त होती. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणतात की सुमारे 1,000 अभियंते आणि शास्त्रज्ञांनी सुमारे 700 कोटी रुपये खर्च करून मिशन सुरू करण्यासाठी काम केले.
लँडिंगनंतरची प्रक्रिया नेमकी काय?
चांद्रयान 3 चे तीन भाग आहेत. त्यामधील एक प्रोप्लशन मॉड्यूल, जो लँडरला चंद्राच्या कक्षापर्यंत घेऊन गेला. त्यामधून विक्रम लँडर वेगळा झाला आणि प्रोप्लशन मॉड्यूल चंद्राच्या कक्षामध्ये फिरतोय. त्यामधून दोन भाग वेगळे झाले, त्यामध्ये विक्रम लँडर आणि रोवर प्रज्ञान यांचा समावेश आहे. विक्रम हा लँडर आहे, जो चंद्रावर लँड केलेय, त्यातून रोवर वेगळा होईल. त्यानंतर प्रज्ञान रोवर चंद्रावर फिरेल अन् तेथील डेटा इस्रोला पाठवेल. विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर प्रज्ञान रोवर आपले काम सुरु करेल.
ही बातमी वाचा: