मुंबई : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्युलला चंद्राच्या जवळ आणण्यासाठी अंतिम डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. आता चांद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. आज पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास चांद्रयान-3 चंद्रापासून 25 किलोमीटर अंतरावर होतं. 'चांद्रयान-3' साठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत. 'चांद्रयान-3' सोबत पाठवलेले विक्रम लँडर व्यवस्थित आहे. चांद्रयान योग्य पद्धतीने चंद्राच्या दिशेने जात आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने दिली आहे. चांद्रयान-3 चं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. लँडिंग करण्यापूर्वी, मॉड्यूलची तपासणी होईल.


चांद्रयान-3 चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर


चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. आता विक्रम लँडर हळूहळू त्याचा वेग कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जात आहे. चांद्रयान-3 ने आज पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान  महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. विक्रम लँडर चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. आता चांद्रयान-3 चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे.






चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यावर पुढे काय?


चांद्रयान-3 मोहिमेचं पहिलं लक्ष्य चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणं आहे. चांद्रयानमधील लँडरचं नाव 'विक्रम' आणि रोव्हरचं नाव 'प्रज्ञान' आहे. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. चांद्रयान-3 चं रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होईल. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचं लक्ष लागलं आहे. 


40 दिवस, 3.84 लाख किलोमीटचा प्रवास


चांद्रयान-3 हे अंतराळयान 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट एलव्हीएम-3 (LVM-3) यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं. चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चांद्रयान-3 मोहिमेतील आतापर्यंतचे सर्व टप्पे ठरल्याप्रमाणे पार पडले आहेत. त्यामुळे सर्व काही नियोजित केल्याप्रमाणे पार पडलं तर, चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.