मुंबई : भारताने चंद्रावर (Moon) पोहोचून जगाच्या पाठीवर आपली वेगळी छाप पाडली आहे. चंद्राच्या कायम अंधारात असणाऱ्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा (Moon's South Pole) भारत पहिला देश ठरला आहे. तर, चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरला आहे. इस्रो (ISRO) च्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक जगभरात केलं जात आहे. जगाला भारताचं सामर्थ्य पटवण्यासाठीचं हे आणखी एक मोठं पाऊल आहे. अवकाश संशोधनात भारत आणखी खूप पुढे जाऊ शकतो, हे सांगण्याचाही हा एक प्रयत्न आहे. भारताने आतापर्यंत तीन चंद्रमोहिमा राबवल्या आहेत आणि चौथ्या मोहिमेसाठी म्हणजेच चांद्रयान-4 साठीही आता इस्रो सज्ज झाली आहे. आतापर्यंतच्या चंद्रमोहिमांपासून भारताला नेमकं काय मिळालं? हे सविस्तर जाणून घ्या.


Chandrayaan-1 : चांद्रयान-1


22 ऑक्टोबर 2008 रोजी पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटद्वारे चांद्रयान-1 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. ही भारताचा पहिली मोहिम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरली. चांद्रयान-1 ने चंद्रावर बर्फ असल्याचा शोध लावला, त्यामुळे चंद्रावर पाण्याचे साठे सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. चांद्रयान-1 चंद्र मोहिमेचा खर्च 386 कोटी रुपये होता. महत्त्वाचं म्हणजे जगाला भारताच्या चंद्रमोहिमेकडून कोणतीही अपेक्षा नव्हती. मात्र, असं असताना भारताने पहिल्या प्रयत्नात चंद्रमोहिम यशस्वी केली आणि चंद्रावर बर्फाचा शोध लावला.


Chandrayaan-2 : चांद्रयान-2


2019 मध्ये भारताने दुसरी चंद्रमोहिम हाती घेतली. 22 जुलै 2019 रोजी जीएसएलव्ही एमके III रॉकेटद्वारे चांद्रयान-2 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. भारताचा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न होता. मात्र, लँडरचा संपर्क तुटल्याने चांद्रयान-2 मोहिम अयशस्वी ठरली. चांद्रयान-2 मोहिमेचा खर्च सुमारे 850 कोटी रुपये होता.


Chandrayaan-3 : चांद्रयान-3


त्यानंतर पुन्हा एकदा भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी चांद्रयान-3 मोहिम आखली. 14 जुलै रोजी इस्रोचं निघालेलं चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. आता चांद्रयान-3 चा प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील पाणी शोधणार असून तेथील विविध फोटो आणि माहिती इस्रोला पाठवणार आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च आला आहे.


Chandrayaan-4 : चांद्रयान-4


चांद्रयान-3 ही चंद्रमोहिम देखील मानवरहित असणार आहे. अंतराळयांन चंद्रावर जाऊन तेथील माती आणि इतर नमुने गोळा करेल आणि पृथ्वीवर पाठवेल. ज्यामुळे भविष्यातील मोहिमांसाठी आवश्यक संशोधन करणं सोयीस्कर होईल. त्यासोबतच चंद्रावर पाण्याचे साठे नेमकी किती आणि कोणत्या ठिकाणी आहेत, याचा अभ्यासही चांद्रयान-4 मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे.


चंद्रावरील शोधाचा सर्वसामान्यांना काय फायदा?


चंद्रावरील शोध हा भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्रावर इतर काही दुर्मिळ खनिजे सापडल्यास त्याचाही मानवाला फायदा होऊ शकतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aditya L-1 Mission : चंद्रानंतर आता 'सूर्या'चा ध्यास... 24 तास सूर्यावर नजर, आदित्य-L1 मोहिमेचा नेमका खर्च किती? 'आदित्य' हे नाव कसं पडलं?