मुंबई : भारताचं चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. चंद्र मोहिमेच्या यशानंतर लगेचच आता इस्रो (ISRO) सूर्य मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. काही दिवसांतच इस्रोकडून पहिली सूर्य मोहिम लाँच करण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता अवकाशात उपग्रह पाठवून सूर्यावर 24 तास नजर ठेवणार आहे. इस्रोच्या या मोहिमेचं नाव आदित्य एल-1 असं आहे.
सूर्य मोहिमेला 'आदित्य' हे नाव कसं पडलं?
भारताच्या महत्त्वाकांक्षी सूर्य मोहिमेचं नाव संस्कृत शब्द ‘आदित्य’ वरून घेतलं आहे. या शब्दाचा सूर्य किंवा सूर्य देवाशी संबंधित असा आहे. त्यामुळे आदित्य हा शब्द निवडण्यात आला. L1 म्हणजे सूर्य-पृथ्वी यांच्यातील लॅग्रेंज पॉइंट. या बिंदूवर सूर्यग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही आणि तेथून 24 तास कायम सूर्य स्पष्ट दिसतो. आदित्य-L1 चे अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या या लॅग्रेंज पॉइंट 1 (Lagrange Point 1) भोवती प्रभामंडल कक्षेत ठेवलं जाईल.
आदित्य-L1 मोहिमेला सुरुवात कशी आणि केव्हा झाली?
अंतराळ संशोधनासाठीच्या सल्लागार समितीने जानेवारी 2008 मध्ये आदित्य-L1 ची संकल्पना मांडली होती. सुरुवातीला सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोरोनाग्राफसह 400 किलो वजनाचा, लो अर्थ ऑब्झर्व्हेशन (LEO) उपग्रह म्हणून या मोहिमेची संकल्पना आखण्यात आली होती. 2016-2017 या आर्थिक वर्षासाठी या मोहिमेसाठी तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.
आदित्य-L1 मोहिमेचा खर्च
दरम्यान, त्यानंतर 2019 मध्ये या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यात आली. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील L1 या ठिकाणी म्हणजेच लॅग्रेंज पॉइंट येथे ठेवण्याची योजना आखण्यात आली. आदित्य एल-1 हा सौर आणि अंतराळ पर्यावरण वेधशाळा म्हणून लॅग्रेंज पॉइंट 1 येथे ठेवण्याची योजना आखण्यात आली. प्रक्षेपण वगळता आदित्य एल-1 मोहिमेचा खर्च 378.53 कोटी रुपये आहे.
आदित्य एल-1 मोहिमेचं उद्दिष्ट
आदित्य एल-1 ही भारताची पहिली सूर्य मोहिम आहे. याद्वारे सूर्य किरणांचा पृथ्वीवर होणारा नेमका परिणाम आणि वातावरणाचा अभ्यास केला जाईल. त्यासोबत सूर्यावरील आणि सभोवतालचं वातावरण, सौर वादळे आणि चुंबकीय वादळे तसेच त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम यांचा अभ्यास हे अंतराळयान करेल.
लॅग्रेंज पॉइंटमध्ये अंतराळयान पाठवण्याचं कारण
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, अवकाशात लॅग्रेंज पॉइंट हा असा बिंदू आहे, जिथे सूर्यग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही. L1 बिंदूच्या भोवतालच्या प्रभामंडल कक्षेत आदित्य एल-1 उपग्रह ठेवल्याने तेथून सूर्याचं निरीक्षण करणं सोपं जाईल. सूर्याच्या वातावरणाचा आणि सूर्यावरील क्रियांचा पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या वातावरणावर नेमका कसा परिणाम होतो, हे समजणं सोपं जाईल.
महत्वाच्या इतर बातम्या :