श्रीहरीकोटा : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ला चंद्रावर उतरण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. इस्रोकडून (ISRO) चंद्र मोहिमेबाबत (Moon Mission) मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-2 चे ऑर्बिटर आणि चांद्रयान-3 विक्रम लँडर यांच्यात संपर्क झाल्याची माहिती इस्रोने दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सोमवारी सांगितलं की, चांद्रयान-2 ऑर्बिटर आणि चांद्रयान-3 लँडर मॉड्यूल 'विक्रम' यांच्यात यशस्वी द्विमार्गी संपर्क झाला आहे. चांद्रयान-3 आधीचं इस्रोचं मिशन चांद्रयान-2 चं ऑर्बिटर अद्यापही चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. 


2019 मध्ये इस्रोच्या चांद्रयान-2 चं यशस्वी प्रक्षेपण झाल्यापासून Ch-2 चं ऑर्बिटरने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. आता चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचं स्वागत केलं आहे. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चांद्रयान-3 च्या लँडरसोबत संपर्क करत संदेश पाठवला आहे. त्यामध्ये त्यानं म्हटलं आहे, "स्वागत मित्रा".






विक्रम लँडरसोबत संपर्क साधण्याचा आणखी एक मार्ग


इस्रोने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. इस्रोने सांगितलं की, चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चांद्रयान-3 च्या विक्रम लँडर मॉड्यूलचं स्वागत केलं आहे. या दोन्हींमध्ये दुतर्फा संवाद प्रस्थापित झाला आहे. आता बेंगळुरूमध्ये स्थित मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) मध्ये विक्रम लँडर मॉड्यूलसोबत संपर्क साधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.


चंद्राच्या पृष्ठभागाचे जवळचे फोटो


आज सकाळी इस्रोने चांद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागाची टिपलेले काही फोटो ट्विट केले. इस्रोने सांगितलं की, विक्रम लँडरमध्ये बसवण्यात आलेला कॅमेरा चंद्रावर सुरक्षित जागा शोधत आहे, जिथे सावधगिरीने विक्रम लँडर उतरवता येईल. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. सध्या चांद्रयान-3 चंद्रापासून 25 किलोमीटर अंतरावर प्रदक्षिणा घालत आहे.


चांद्रयान 40 दिवसानंतर चंद्रावर उतरणार


चांद्रयान-3 हे अंतराळयान 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट एलव्हीएम-3 (LVM-3) यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं. चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चांद्रयान-3 मोहिमेतील आतापर्यंतचे सर्व टप्पे ठरल्याप्रमाणे पार पडले आहेत. त्यामुळे सर्व काही नियोजित केल्याप्रमाणे पार पडलं तर, चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.