बंगळुरु : भारताच्या चांद्रयान-2 ने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चांद्रयान-2 ने आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इस्रोने दिली. आता 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे.


चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे इस्रोच्या चंद्रयान-2 मोहिमेतील दुसरा महत्वाचा आणि कठीण टप्पा असल्याचं इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी होतं. त्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी इस्रोसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. 22 जुलै रोजी चांद्रयान-2 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथे लॉन्च करण्यात आलं होतं.





पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोत जाणार


येत्या 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 सप्टेंबरला 'इस्रो'मध्ये जाणार आहेत.


चांद्रयान 2 चे तीन भाग


चांद्रयान 2 ला तीन भागात विभागण्यात आलं आहे. पहिला भाग ऑर्बिटर आहे, जो चंद्राच्या कक्षेत राहिल. दुसरा भाग लॅण्डर ज्याचं नाव आहे विक्रम, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तर तिसरा भाग आहे प्रग्यान जो रोव्हर असून तो चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत राहिल.


चांद्रयान 2 मोहिमेची वैशिष्ट्ये काय?




  • चांद्रयान तब्बल 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतर पार करुन चंद्रावर पोहोचणार

  • चंद्रावर पोहचण्यासाठी चांद्रयान 2 ला 55 दिवसांचा कालावधी लागणार

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर प्रज्ञान उतरेल

  • चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान चंद्रावरची माहिती कंट्रोल सेंटरला पाठणार


संबंधित बातम्या