नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. पाकिस्तान आणि जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांची येणारी वक्तव्य याविषयावर ही चर्चा झाल्याचं समोर येत आहे. पाकिस्तानमधील नेत्यांची भाषा शांततेत भंग आणत असल्याचं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्याशी चर्चेदरम्यान ओसाका येथील जी-20 शिखर संमेलनाचा देखील उल्लेख केला. या चर्चेदरम्यान पाकिस्तानचं नाव न घेता भारतविरोधी भडकाऊ वक्तव्य केली जात असल्याचं सांगितलं. अशा वक्तव्यांमुळे हिंसाचाराला खतपाणी घातलं जात आहे. अशारीतीने जम्मू काश्मीरमधील शांतता भंग केली जात आहे, असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं.


जम्मू काश्मीरमधील परिस्थितीच माहिती देत अशा परिस्थितीत भारतविरोधी आणि हिंसक वक्तव्य शातंतेत भंग आणू शकतात. हिंसा मुक्त वातावरण निर्माण करणे आणि दहशतवाद मिटवण्याबाबत पावलं उचलण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं. तसेच शिक्षण, गरीबी, आरोग्य या मुद्द्यांवर काम करण्यास तयार असलेल्या देशांना सहकार्य करण्यास तयार असल्याचंही मोदींनी सांगितलं.


याआधी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याची फोनवर चर्चा केली होती. जम्मू काश्मीरचा मुद्दा दोन्ही देशांनी द्विपक्षीय चर्चा करुन मिटवावा, असं ट्रम्प यांनी इम्रान खान यांना सांगितलं होतं.


भारताने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. तसेच भारताचे पाकिस्तानमधील राजदूत यांनाही परत पाठवलं होतं. त्यानंतर सातत्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महसूद कुरेशी सातत्याने भारतविरोधी वक्तव्य करत आहेत.