नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. रविवारी एकाच दिवशी एक लाखाहून जास्त रुग्णसंख्येची भर पडली होती. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब या तीन राज्यात कोरोनाचा कहर झाल्याचं दिसून येतोय. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता केंद्र सरकारने पाऊले उचलायला सुरुवात केली असून या तीन राज्यांत सोमवारी 50 हाय लेव्हल हेल्थ टीम पाठवण्यात आल्या आहेत. 


या प्रत्येक टीममध्ये दोन सदस्य असतील. त्यामध्ये एक इपिडर्मिटोलॉजिस्ट आणि एक आरोग्य तज्ज्ञाचा समावेश असेल. या टीम महाराष्ट्रातील 30 जिल्हे, छत्तीसगडमधील 11 जिल्हे आणि पंजाबमधील 9 जिल्ह्यातील स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय साधणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कोरोना काळात घ्यावयाच्या खबरदारी, उपलब्ध सुविधा, टेस्टिंग आणि इतर गोष्टींबद्दलही मार्गदर्शन करणार आहेत. 


सोमवारी सकाळची आकडेवारी लक्षात घेता महाराष्ट्रात 47,288, छत्तीसगडमध्ये 7,302 आणि पंजाबमध्ये 2,692 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. देशातल्या एकूण नवीव रुग्णसंख्येपैकी अर्ध्या रुग्णसंख्येची भर ही एकट्या महाराष्ट्रातून पडत आहे. 


देशातील कोरोनाचा उद्रेक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. रविवारी बोलताना पंतप्रधानांनी 5 फोल्ड स्ट्रॅटेजी म्हणजे टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेन्ट, गाईडलाइन्स नुसार वर्तन आणि लसीकरण या गोष्टींचे गंभीरपणे पालन केल्यास कोरोनाचे संकट नियंत्रणात येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला होता. 


देशातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखावर
देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं सांगण्यात येतंय. सध्या देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती संख्या आता सात लाखावर गेली आहे. गेल्या चोवीस तासात 50,438 अॅक्टिव्ह रुग्णांची भर पडली आहे. देशातील 88 टक्के अॅक्टिव्ह रुग्णसंख्या केवळ दहा राज्यांत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सांगतेय.


देशभरात गेल्या रविवारी कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. देशात कोरोनानं शिरकाव केल्यापासून पहिल्यांदाच देशात नव्या कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 3 हजार 588 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे.



महत्वाच्या बातम्या :