मुंबई : कोरोना संसर्ग अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच तो रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून नुकतेच काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले. ज्याअंतर्गत सोमवारी 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावताना सर्व घटकांची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. असं असलं तरीही भाजी मंडई, फूल मार्केट मात्र अद्यापही बंद करण्यात आलेले नाहीत. पण, अर्थातच या ठिकाणी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं जाणं अतिशय महत्त्वाचंही आहे. पण, तसं होतना मात्र दिसत नाही आहे. 


दादर येथे असणाऱ्या भाजी मंडई आणि फूल मार्केटमध्ये जमलेली गर्दी याचीच प्रचिती देत आहे. एकिकडे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गर्दीची ठिकाणं टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून सातत्यानं करण्यात येत आहे. पण, प्रशासनाला केराची टोपली दाखवत नागरिक मात्र पावलोपावली त्याच्या बेफिकीरीचीच झलक दाखवत आहेत. 


Corornavirus : देशात गेल्या 24 तासांत एक लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद; जवळपास अर्धी रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांअंतर्गत मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कर्फ्यूच्या नियमांअतर्गत रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेशही लागू आहेत. पण, या आदेशांना धुडकावत सकाळी हा वाजल्यापासून दादरमध्ये जणू कोरोना केव्हाचाच पाठ फिरवून दूर पळाला आहे, अशा अविर्भावात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. 


In Pics | आगवे; कोरोनाला वेशीवरच रोखणारं कोकणातील गाव  


फळं, भाजीपाला आणि इतर काही वस्तूंची खरेदी करण्यासाठी आलेल्या या गर्दीत काहींनीतर, मास्कही वापरला नव्हता, सोशल डिस्टन्सिंग ही संकल्पनाच इथं पायाखाली चिरडून गेल्याचं पाहायला मिळालं. नागरिक आणि विक्रेत्यांचं हे निर्धास्त वर्तन एकिकडे कोरोना रुग्णसंख्या वाढीस कारण ठरत आहे तर तिथं प्रशासनाची डोकेदुखीही वाढवत आहे. मुख्य म्हणजे सध्याच्या घडीला प्रशासन कठोर निर्बंधापुरताच सीमीत राहिलं आहे. पण, नागरिकांकडून वारंवार होणारी ही चूक पाहता आता त्यांच्याच हितासाठी राज्यात लॉकडाऊन लागू झालं, तर यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.