नवी दिल्ली: अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी आणि जर्मन बायोटेक कंपनीने विकसित केलेली कोविड 19 ची लस 90 टक्के प्रभावी असल्याची घोषणा झाल्यानंतर जगात काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकेत उपलब्ध होण्याची शक्यता असलेली ही लस भारतात मात्र लवकर उपलब्ध होईल की नाही याबाबत शंका आहे. परंतु फायझर कंपनी आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय या दोघांनीही यावर चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत.


फायझर कंपनीने दावा केला होता की, त्यांनी विकसित केलेली कोविड 19 लस ही 90 टक्के प्रभावी आहे. एक स्वतंत्र डेटा देखरेख समितीने केलेल्या विश्लेषणानुसार, फायझर आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म बायोटेक यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे आधी दिसत नव्हती त्यांच्यावर ही लस प्रभावी ठरली आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.


फायझरच्या या दाव्यामुळे जगाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. फायझरच्या या अभ्यासात अमेरिका आणि इतर पाच देशांतील 40 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. कंपनीच्या या दाव्यावर आता तिला दोन महिन्यांचा फॉलो अप डेटा पुरवावा लागणार आहे. त्यामध्ये गंभीर आजारी आणि वयोवृध्द लोकांवर या लसीचा किती परिणाम होतो हे तपासावे लागेल.


फायझरच्या या दाव्याला अमेरिकन रेगुलेटरकडून इमर्जंसी ऑथोरायझेशनसाठी मान्यता मिळवावी लागणार आहे. या सपूर्ण प्रक्रियेला नोव्हेंबरचा तिसरा आठवडा जाण्याची शक्यता आहे.


वर्षाअखेरीस 50 दशलक्ष डोस उपलब्ध होण्याची अपेक्षा


या वर्षीच्या शेवटपर्यंत केवळ 50 दशलक्ष डोस आणि 2021 साली 1.3 अब्ज लसींची उपलब्ध होण्याची शक्यता आहे असे फायझरच्या भारतातील प्रवक्त्यांनी सांगितले. कंपनीने याआधी अमेरिका, ब्रिटन आणि जपान या देशांशी पुरवठ्याबाबत करार केला असल्यांने लस वितरणात या देशांना प्राथमिकता मिळणार आहे. परंतु भारतात या लसीचे उपलब्धता करण्याविषयी सरकारशी आम्ही बोलत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.


भारताने आतापर्यंत तरी फायझर कंपनीशी कोणत्याही प्रकारचा करार केला नाही. भारतात या लसीचे उपलब्धतेपूर्वी लोकल ट्रायल करण्याची आवश्य़कता आहे. त्यानंतरच ही लस अंतिम स्वरुपात देशात उपलब्ध होऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी या लसीच्या उपलब्धतेबाबत फायझर कंपनीशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, "कोविड 19 ची लस देशात उपलब्ध करण्यासाठी सरकारचा एक तज्ञ गट देशातील आणि विदेशातील लसीच्या निर्मात्यांशी चर्चा करत आहे. या चर्चेदरम्यान संबंधित लसीच्या विकासाच्या स्थितीचा अंदाज घेण्यात येईल. तसेच या लसींच्या साठवणुकीबाबतही चर्चा करण्यात येईल.'


भारतातील तज्ञांच्या मते अशा प्रकारच्या लसींच्या साठवणुकीसाठी शुन्य ते वजा सत्तर डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते आणि भारतात अशा प्रकारच्या कोल्ज स्टोरेज च्या पायाभूत सुविधांची कमतरता आहे.


महत्वाच्या बातम्या:


Corona Vaccine Update | कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी, Pfizer कंपनीचा दावा


Corona Vaccine | कोरोनावरील स्वदेशी लस 60 टक्के प्रभावी असण्याची शक्यता, भारत बायोटेकचा दावा


Covid-19 vaccine | कोरोना लसीकरणासाठी तीन स्तरीय समिती स्थापन करा, केंद्राचे राज्यांना निर्देश


जाणून घ्या भारतात कोरोना विषाणूच्या लसीची किंमत किती असू शकते?