नवी दिल्ली: भारतातील कोरोनावर तयार होणारी पहिली लस कोवॅस्किन ही किमान 60 टक्के प्रभावी असेल असा दावा ही लस तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे. या कंपनीला भारतीय औषधे महानियंत्रक (DCGI) कडून गेल्या गुरुवारी तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षण सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे.


स्वदेशी कोविड लस ही किमान 60 टक्के प्रभावी असण्याची शक्यता
तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षणाचे अंतिम निकाल पुढच्या वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारतीय बायोटेक कंपनीचे कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी याविषयी सांगितले की, "कोविड 19 वरील स्वदेशी लस ही किमान 60 टक्के प्रभावी असेल. आता आम्ही कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील सर्वात मोठ्या मानवी चाचणीचे परीक्षण करणार आहोत. याचे निकाल हे 2021 सालच्या एप्रिल किंवा मे महिन्यात येतील."


साई प्रसाद हे भारत बायोटेक कंपनीत उत्पादन विकास टीमचे सदस्य आहेत. त्यांनी सांगितले की कोरोनावरील अशा प्रकारची लस जर 50 टक्के जरी प्रभावी ठरली तरी त्याला जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकेची फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन आणि भारताची केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना मंजुरी देतात. स्वदेशी कोरोना लस संदर्भात आमचे लक्ष किमान 60 टक्के प्रभावी किंवा त्यापेक्षा जास्त असणे हे आहे. आतापर्यंत केलेल्या संशोधनावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे.


भारतात तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परीक्षण सुरु
भारत बायोटेकने पहिल्या टप्प्यातील मानवी परीक्षणाचे निकाल भारतीय औषधे महानियंत्रक (DCGI) समोर सादर केले आहेत. त्यावर कोणतीही मोठी शंका व्यक्त करण्यात आली नाही. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षणाची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे आणि आता या लसीचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांची तपासणी होत आहे. तज्ञांच्या मते तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. श्रीनाथ रेड्डी यांच्या मते या लसीची मोठ्या प्रमाणावर चाचणी केल्यास त्याचे खरे परिणाम समोर येतील.


साई प्रसाद यांनी सांगितले की, "या लसीचे वार्षिक 150 दशलक्ष डोस उत्पादन करण्याची क्षमता निर्माण करण्याचा विचार भारत बायोटेक कंपनी करत आहे. या लसीच्या किंमतीवर अजून कोणतीही चर्चा झाली नाही." त्यांनी असेही सांगितले की "तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षणावर 150 करोड रुपये खर्च करण्यात येणार आहेत."



संबंधित बातम्या:


जाणून घ्या भारतात कोरोना विषाणूच्या लसीची किंमत किती असू शकते?