Bihar Election Result : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. आता सर्व 243 जागांचे निकाल हाती असून NDA ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर विजय मिळवला. आहे. एनडीएच्या 125 जागांमध्ये भाजपने 74 जागा. जदयूने 43 तर मित्र पक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून एनडीएला बहुमत मिळालं आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.


दुसरीकडे महागठबंधननं 110 जागा जिंकल्या आहेत. यात  तेजस्वी यादव यांच्या राजदनं 75 जागा मिळवल्या आहेत. राजद बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसला 19 जागांवर तर डाव्यांना 16 जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे.


या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील नागरिकांचे आभार मानले आहेत. बिहारमध्ये लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लोकशाही जिंकली आहे.  एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेले निर्धार आणि समर्पण यासाठी महत्वाचे आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो तसेच बिहारच्या सर्व नागरिकांचे आभार मानतो, असं मोदींनी म्हटलं आहे.





पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारमधील ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी-कामगार, व्यापारी-दुकानदार, बिहारमधील प्रत्येक घटकाने एनडीएच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या घोषणेवर विश्वास ठेवला.  मी पुन्हा बिहारच्या प्रत्येक नागरिकांना आश्वासन देतो की आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक क्षेत्राच्या समतोल विकासासाठी पूर्ण समर्पणानं निरंतर काम करत राहू.


बिहारच्या माता भगिनींनी यावेळी विक्रमी संख्येने मतदान केले. आत्मनिर्भर बिहारमध्ये त्यांची भूमिका किती मोठी आहे हे त्यांनी दाखवून दिलं. आम्ही समाधानी आहोत की गेल्या काही वर्षांत एनडीएला बिहारच्या मातृशक्तीला नवीन आत्मविश्वास देण्याची संधी मिळाली. हा आत्मविश्वास बिहारच्या प्रगतीस सामर्थ्य देईल, असं पंतप्रधान म्हणाले.


कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या


एनडीए-125
भाजप-74
जेडीयू-43
विकासशील इंसान पार्टी-04
हिन्दुस्तानी अवाम मोर्चा-04


महागठबंधन-110
आरजेडी-75
काँग्रेस-19
भाकपा-माले-12
सीपीएम-02
सीपीआय-02


एएमआयएम - 5
बहुजन समाज पार्टी - एक
लोक जनशक्ति पार्टी - एक
अपक्ष - एक