राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सत्यपाल मलिकांना सीबीआयची नोटीस, इन्शुरन्स स्कॅमबाबत विचारले प्रश्न
Satya Pal Malik: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुलवामा हल्ला आणि भ्रष्टाचारासंबंधी आरोप केले होते.
Satya Pal Malik: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस जारी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील इन्शुरन्स स्कॅमबाबत प्रश्नावली पाठवून त्याची उत्तरे द्यावीत असं सांगणारी नोटीस सीबीआयने बजावली आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुलवामा हत्याकांडावरुन प्रश्न उपस्थित केले होते. ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना पुलवामा हल्ला झाला होता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विदेशी टीव्ही चॅनेलच्या शूटिंगसाठी जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये होते.
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना 'द वायर' या वेबसाईटसाठी दिलेल्या स्फोटक मुलाखतीत राष्ट्रीय सुरक्षा आणि भ्रष्टाचार याविषयी अनेक गौप्यस्फोट केले होते.
CBI issues notice to former Jammu and Kashmir governor Satyapal Malik to answer queries related to insurance scam: Officials
— Press Trust of India (@PTI_News) April 21, 2023
करण थापर यांना मलिक यांनी दिलेल्या मुलाखतीची देशभरात मोठी चर्चा झाली होती. या मुलाखतीनंतर त्यांच्यामागे सीबीआयकडून चौकशीचं शुक्लकाष्ठ लागण्याची शक्यता आहे. सीबीआयने त्यांना इन्शुरन्स स्कॅमबाबत प्रश्नावली पाठवून 28 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस जारी केल्याचं द वायरच्या वृत्तात म्हटलंय. सीबीआय चौकशी करत असलेला इन्शुरन्स स्कॅम रिलायन्स इन्शुरन्ससंदर्भातील आहे. सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना, भाजप नेते राम माधव हे रिलायन्स इन्शुरन्सचा प्रस्ताव मंजूर करवून घेण्यासाठी दबाब टाकत होते, असा गौप्यस्फोट मलिक यांनी करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत केला होता. सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल म्हणून त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन रिलायन्स इन्शुरन्सचा प्रस्ताव रद्द केला होता.
रिलायन्स इन्शुरन्सचा प्रस्ताव संमत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि भाजप नेते राम माधव यांनी व्यक्तीशः सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन चर्चा केली होती, मात्र हा आधी फेटाळलेला प्रस्ताव पुन्हा संमत करण्यास मलिक यांनी स्पष्ट नकार दिला. करण थापर यांना दिलेल्या सविस्तर मुलाखतीत रिलायन्स इन्शुरन्स स्कॅमविषयी विस्ताराने चर्चा केली आहे. सत्यपाल मलिक यांनी ही माहिती डीबी लाईव्ह या नियतकालिकाच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीतही राम माधव यांच्या हिंतसंबंधाचा उल्लेख केला होता. ही मुलाखत द वायरसाठी करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या आधी प्रसारीत झाली होती. त्यानंतर राम माधव यांनी सत्यपाल मलिक यांना अब्रू नुकसानीची नोटीसही बजावली होती. डीबी लाईव्हसाठी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत टंडन यांनी ही मुलाखत घेतली असल्याचं द वायरच्या बातमीत म्हटलंय.