ज्Brij Bhushan Singh Case : भाजपचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महिला कुस्तीपटूंनी (Wrestler) केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे बृजभूषण सिंह यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. परंतु आता अल्पवयीन महिला कुस्तीपटूने आपला जबाब मागे घेतला आहे. त्यामुळे यानंतर बृजभूषण सिंह यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून पॉक्सोअंतर्गत लावण्यात आलेले आरोप हे काढून टाकले जाऊ शकतात. अल्पवयीन महिला कुस्तीपटूने आपला जबाब मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे या प्रकरणाला कोणतं वळण मिळणार हे सविस्तर जाणून घेऊया.
पॉक्सोअंतर्गत दाखल करण्यात आला होता गुन्हा
भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सोअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कायदेतज्ञ मुरारी तिवारी यांच्याशी एबीपी न्यूजने संवाद साधला. यावर कायदेतज्ञांनी काय विश्वेषण केले सविस्तर जाणून घेऊया.
आरोपीला मिळू शकतो दिलासा
कायदेतज्ज्ञ मुरारी तिवारी यांनी म्हटलं की, "यासारख्या प्रकरणांमध्ये पीडितेचा जबाब बदलल्यामुळे आरोपीला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असते. अशा वेळी पीडितेच्या जबाबवर संशय निर्माण केला जाऊ शकतो ज्यामुळे आरोपीला फायदा मिळण्यास मदत होते." तसेच त्यांनी पुढे म्हटलं की, "ज्या दंडाधिकार्यांसमोर 164 नुसार जबाब नोंदवण्यात आला आहे ते संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करत नाहीत. दंडाधिकार्यांसमोर पीडितेचा जबाब नोंदवण्यात येतो आणि त्यानंतर तो जबाब पोलीसांच्या आरोपपत्राला जोडले जातात. त्यानंतर ज्या न्यायालयासमोर संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होते ते ठरवातात की 164 नुसार नोंदवण्यात आलेला जो जबाब मागे घेण्यात आला आहे त्याचा स्वीकार करायचा की नाही." त्यामुळे आता अल्पवयीन पीडित कुस्तीपटूने केलेल्या लैंगिक शोषणाचा आरोप मागे घेतल्यामुळे बृजभूषण सिंह यांना दिलासा मिळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कुस्तीपटूंनी घेतली अमित शाह यांची भेट
कुस्तीपटूंनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कुस्तीपटू आणि अमित शाह यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा सुरु होती. या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या चौकशी मागणी तर केलीच परंतु त्यांनी लवकरात लवकर अटक करण्याची देखील मागणी यावेळी कुस्तीपटूंनी केली. याप्रकरणात पोलीस योग्य ती चौकशी करत आहेत, तसेच कायदा योग्य तो न्याय नक्की करेल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुस्तीपटूंना दिलं. अमित शाह आणि कुस्तीपटू यांच्यामध्ये शनिवारी रात्री 11 वाजता बैठक झाली. या बैठकीमध्ये साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचा समावेश होता.